जिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा मुख्यमंत्र्यांकडून विशेष बाब म्हणून मान्यता; शहर जिल्हा भाजपाने मानले आभार
लातूर प्रतिनिधी – लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारणीस यापुर्वी मान्यता मिळाली होती. मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील काही आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय यांच्या बांधकाम पक्रीयेस स्थगिती दिली होती. परिणामी लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली होती. तसेच यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. याबाबत जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधींसह माझे लातूर परिवाराने पाठपुरावा केलेला होता. या पाठपुराव्यास यश आले असून लातूर जिल्हा रुग्णालय उभारणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून मान्यता दिली असल्याने शहर जिल्हा भाजपाने मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारल्याने येथील जिल्हा रुग्णालयाचे अस्तित्व संपुष्टात आलेले होते. लातूर येथे जिल्हा रुग्णालय नसल्याने शहरासह जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊन त्यांची मोठी अडचण होत होती. लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारण्यात यावे याकरिता सातत्याने पाठपुरावा सुरु होता. जिल्हा रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाल्यानंतर जागेअभावी त्याच्या कामास सुरुवात झालेली होती. सदर अडचण लक्षात घेऊन तत्कालीन पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी कृषी महाविद्यालयाची जागा जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून दिलेली होती. मात्र आरोग्य विभागाकडून या जागेसाठी आवश्यक असलेली रक्कम कृषी विभागाला वर्ग केली नव्हती. यासाठी पाठपुरावा झाल्यानंतर रक्कम जमा झाली मात्र पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालय उभारणीसाठी शासन निर्णयाची अडचण आली. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय यांच्या बांधकामास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता.
लातूर येथे जिल्हा रुग्णालय नसल्याने रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ जिल्हा रुग्णालय उभारण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात यावी अशी मागणी शहर जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली होती. याबाबत शहर जिल्हा भाजपासह जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधी व माझे लातूर परिवाराने सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश आलेले असून पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारण्यास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता लातूर येथे जिल्हा रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला असल्याने शहर जिल्हा भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले व जिल्ह्यातील भाजपा लोकप्रतिनिधींचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच जिल्हा रुग्णालय बांधकामाचा भुमीपुजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत लवकरच पार पडेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केला आहे.
