• Fri. Oct 17th, 2025

भाषा व साहित्याच्या अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करावीत- डॉ मनोहर भंडारे 

Byjantaadmin

Sep 25, 2025

भाषा व साहित्याच्या अभ्यासासोबत विद्यार्थ्यांनी कौशल्य विकसित करावीत- डॉ मनोहर भंडारे 

निलंगा : जग अत्यंत जलद गतिने धावत आहे, यातूनच स्पर्धा निर्माण होत आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी  हिंदी, मराठी व इंग्रजी साहित्याच्या  अभ्यासा सोबत  विविध  कौशल्यात प्राविण्य मिळवावे . जगात एकीकडे  बेकारीचे लोंढेच्या लोंढे पाहायला मिळतात तर दुसरीकडे मात्र कौशल्यात प्रविण व पारंगत असलेल्या विद्यार्थ्यांची कमतरता जाणवत आहे. याच संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले करिअर समृद्ध करावे असे प्रतिपादन हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर येथील  प्राध्यापक डॉ. मनोहर भंडारे  यांनी केले. 

निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या वतीने हिंदी पंधरवाडा  व भाषा व वाड:मय मंडळाच्या उदघाटन  प्रसंगी ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. मार्गदर्शनाच्या शेवटी त्यांनी ज्यांना उत्तम बोलता येते त्यांनी निवेदकाचे कौशल्य शिकावे, ज्यांना उत्तम लिहिता येत त्यांनी लेखन कींवा पत्रकारितेत प्रवेश करावा,  ज्यांना अनेक भाषेचे ज्ञान आहे त्यांनी अनुवादकाची भूमिका निभवावी. अशा बऱ्याच ठिकाणी भाषेच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम हे होते.अध्यक्षीय समारोप प्रसंगी त्यांनी “लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” या हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

या प्रसंगी विचारमंचावर उपप्राचार्य तथा मराठी विभाग प्रमुख  डॉ.भास्कर गायकवाड, हिंदी विभागप्रमुख  डॉ.बालाजी गायकवाड , इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.अजित मुळजकर , डॉ.हंसराज भोसले, डॉ.मुल्ला मुस्तफा, डॉ.विजय कुलकर्णी ,प्रा.मनिषा घोगरे आदी उपस्थित होते. तसेच हिंदी पंधरवाड्याच्या निमित्ताने निबंध, शुध्द लेखन , सामान्य ज्ञान, पोस्टर स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात तिसरे बक्षीस कु.सय्यद सानिया जैनुद्दीन , दुसरे बक्षीस-कु.सुरवसे शिवदिक्षा गोविंद तर पहिले बक्षीस कु.सुर्यवंशी नेहा वामन यांनी पटकावले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ हिंदी,मराठी , इंग्रजी वाड:मय मंडळाच्या अध्यक्षपदी क्रमशः कु.मुस्कान पठाण,कु.सुप्रिया इबीते, कु.शुभांगी कांबळे यांची निवड करण्यात आली. तर सचिव पदी कु.रुपाली काळे, कु.नेहा लामतुरे, कु.श्रध्दा परांडे  यांची  निवड करण्यात आली.  वाड्:मय मंडळ पदाधिकाऱ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले या प्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते हिंदी साहित्यिकांवर तयार करण्यात आलेल्या भीत्तीपत्रिकेचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन -नियोजन डॉ.गोविंद शिवशेट्टे यांनी घडवून आणले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाची विद्यार्थिनी कु.मुस्कान पठाण , सुत्रसंचालन अली सुमैय्या व अश्विनी कांबळे तर आभार रुपाली काळे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.सिध्देश्वर कुंभार व श्री. सुनिल वाकळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *