आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर वरून कानपुर पोलिसांनी केलेल्या कार्यवाही विरोधात निषेध मोर्चा.
व प्रेषिद मोहम्मद पैंगबर यांच्या गौरवात हाजारो मुस्लिम बांधव एकवटले..
लातूर प्रतिनिधी – :
उत्तर प्रदेशातील कानपूर व शहाजानपूर येथे घडलेल्या धर्मभावना दुखावणाऱ्या घटनांच्या निषेधार्थ, लातूर येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज एक भव्य व शांततामय निषेध मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा हजरत टीपू सुलतान चौक येथून सुरू होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे समारोप झाला. लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून, पूर्णतः शांततेच्या मार्गाने आपली श्रद्धा आणि निषेध व्यक्त केला.
कानपूर येथील “I Love Mohammad” फलक प्रकरणात काही युवकांनी श्रद्धेने प्रेरित होऊन सार्वजनिक ठिकाणी फलक लावला होता. हा फलक पूर्णतः शांततामय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीत असतानाही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ही कृती संविधानातील धर्मस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्पष्ट भंग आहे. शहाजानपूर येथे एका व्यक्तीने प्रेषित हजरत मोहम्मद (स.अ.व.) यांच्याविरोधात अत्यंत द्वेषपूर्ण व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकारची विधाने केवळ धार्मिक भावना दुखावणारी नसून, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेलाही धोका निर्माण करणारी आहेत.
अहमदनगर येथील रामगिरी नावाच्या व्यक्तीनेही हजरत मोहम्मद (स.अ.) यांच्याविरोधात अश्लील आणि खोट्या स्वरूपाची विधाने करून मुस्लिम समाजाचा अपमान केला. त्याच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे अशा प्रवृत्ती अधिक बळावल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील काही आमदार आणि नेत्यांनी वारंवार मुस्लिम समाजाबद्दल द्वेषमूलक भाष्य केल्यामुळे राज्यात धार्मिक तणाव वाढत आहे. यामध्ये नितेश राणे, संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या विधानांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी समाजाची मागणी आहे.
या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सामाजिक, धार्मिक व युवक नेत्यांनी आपल्या भाषणांमधून सांगितले की, मुस्लिम समाज शांततेच्या मार्गाने, कायद्याच्या चौकटीत राहून आपले म्हणणे मांडत आहे. श्रद्धेचा आणि धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही आणि न्याय मिळेपर्यंत संविधानिक मार्गाने संघर्ष सुरू राहील. हा निषेध केवळ भावना व्यक्त करण्यापुरता मर्यादित नसून, तो सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचे एक सकारात्मक उदाहरण ठरावा, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत.
मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनासमोर विविध मागण्या मांडण्यात आल्या आहेत. कानपूर प्रकरणातील युवकांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. शहाजानपूर येथील आरोपीविरुद्ध कठोर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. अहमदनगरमधील रामगिरी याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी. समाजात द्वेष पसरवणाऱ्या आमदार व नेत्यांवर कायदेशीर व संविधानिक कारवाई करण्यात यावी आणि त्यांची आमदारकी रद्द करण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत. केंद्र सरकारने धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटनांवर आळा घालण्यासाठी “धार्मिक भावना संरक्षण कायदा” लागू करावा. सोशल मीडियावर द्वेष पसरवणाऱ्या खात्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात यावी. शाळा व महाविद्यालयांमध्ये धार्मिक सहिष्णुता, मूल्यशिक्षण आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित अभ्यासक्रम व कार्यक्रम राबवण्यात यावेत. मुस्लिम समाजावर वाढणाऱ्या धार्मिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती-जमातींसाठी जसा ॲट्रॉसिटी कायदा आहे, तसाच मुस्लिम समाजासाठीही स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा.
हा संपूर्ण मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध व शांततेच्या वातावरणात पार पडला. महिलांचा, तरुणांचा, वयोवृद्धांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि धर्मगुरूंचा मोठा सहभाग होता. फलक, बॅनर, पोस्टर आणि घोषणांद्वारे समाजाच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात मोर्चा सुरक्षितरित्या पार पडला.
या मोर्चाच्या समारोपस्थळी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सर्व मागण्या स्पष्टपणे नमूद करण्यात आल्या असून, या गंभीर घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.समस्त मुस्लिम समाजाने संविधानिक मार्गाने, अत्यंत संयमित व शांततेच्या वातावरणात आपला निषेध नोंदवून, धर्म, श्रद्धा आणि सन्मान यांच्यावर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, हा स्पष्ट संदेश शासन आणि प्रशासनाला दिला आहे.— समस्त मुस्लिम समाज, लातूर

