• Thu. Feb 5th, 2026

सरकारचा लाडक्या बहिणींना झटका:वय चोरणाऱ्या महिलांचा पत्ता कट

Byjantaadmin

Sep 22, 2025

सरकारचा लाडक्या बहिणींना झटका:वय चोरणाऱ्या महिलांचा पत्ता कट

लातूर : एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोघींना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ मिळेल असे स्पष्ट असतानाही काही कुटुंबांतील तिघी चौघी जणींनी नोंदणी केल्याचं निदर्शनास आले आहे. याशिवाय 21 ते 65 वर्ष वयोगटाची अट असताना काही महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असल्याचे पडताळणीत आढळले. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील 4 हजार 827 लाडक्या बहिणींचा पत्ता कट झाला आहे.

महिला व मुलींना स्वावलंबी आणि राज्य आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या वतीने गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू झाल्याने लाभाचे नियम, अटींकडे फारसे लक्ष केंद्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे योजनेचा लाभ मिळावा म्हणून काही महिलांनी कुटुंबांत चारचाकी असणे, संगांयो, इंगांयो, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असतानाही नोंदणी केल्याचे निदर्शनास आले.

याशिवाय, काही कुटुंबांतील तीन-चार महिलांनी तर काहींनी वय बसत नसतानाही अर्ज केल्याचे उघडकीस आल्याने फेरपडताळणी करण्यात आली. योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात ५ लाख ९२ हजार २३१ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७७२ प्रस्ताव अपात्र ठरले.सध्या लातुर जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ४५९ लाभार्थी महिला आहेत. शासनाच्या निर्देशानुसार २१ पेक्षा कमी व ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या संशयित लाभार्थींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यात १६१६ महिला अपात्र ठरल्या आहेत.तसेच एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या संशयावरून ५५ हजार ०९२ महिलांच्या कागदपत्रांची तपासणी झाली. त्यात ३ हजार २११ महिला अपात्र ठरल्या आहेत.

वयोमर्यादा ६५ तरी महिलांनी घेतला फायदा

किमान २१, तर कमाल वय ६५ वर्षे असणे बंधनकारक आहे, मात्र काहींनी १९, २० वय असतानाही लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वय झालेल्या महिलांचाही लाभार्थी यादीत समावेश असल्याचे प्रत्यक्ष पडताळणीत आढळून आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *