राष्ट्रीय जलतरण, निलंग्याच्या हर्षवर्धन अंबादास जाधवला रौप्य पदक
निलंगा : भारतीय जलतरण महासंघातर्फे पश्चिम बंगाल येथील गंगा नदीपात्रात आयोजित १९ किलोमीटर जलतरण स्पर्धेत येथील प्रसिद्ध तथा व्यापारी काँग्रेस पक्षाचे नेते अंबादास जाधव यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधवने २ तास ३५ मिनिटात १९ किलोमीटर अंतर पोहत पार करत तिसरा क्रमांक पटकावित सिल्वर मेडल प्राप्त करून देशात महाराष्ट्राची मान उंचावली आहे.
नाशिक येथील भोसला सैनिकी विद्यालयाचा इयत्ता नववी वर्गातील विद्यार्थी व निलंग्याचा भूमिपुत्र हर्षवर्धन जाधवने गतवर्षी नेरूळ येथे झालेल्या महाराष्ट्र फिन्स जलतरण स्पर्धेत एक रौप्य व तीन कास्य पदक जिंकले होते. वेगवेगळ्या चार गटांतून हर्षवर्धनने सहभाग नोंदवित शंभर मीटर सरफेस स्वीमिंग स्पर्धेत रौप्य पदक, २०० मीटर फ्रीस्टाईल बायफिन्स, ४ बाय ४०० मीटर फ्रीस्टाईल मिक्स रिले व ४ बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले या तिन्ही प्रकारात त्याने कास्यपदक पटकावले होते. या कामगिरीच्या आधारावर हर्षवर्धनची पश्चिम बंगाल येथील राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी राज्यातून निवड झाली होती. गंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याच्या विरुद्ध दिशेने हि स्पर्धा पार पडली. भारतासह अन्य देशातील एकूण १ हजार
स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. १९ किलोमीटरची हि स्पर्धा हर्षवर्धनने २ तास ३५ मिनीट ४० सेकंद एवढ्या विक्रमी वेळेत पूर्ण करून तिसरा क्रमांक मिळविला. मुरशिदाबादचे खा. आबु ताहेर खान यांच्या हस्ते ट्रॉफी व सिल्वर मेडल देवुन हर्षवर्धनचा सन्मान करण्यात आला. हर्षवर्धनची नोव्हेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या आंतराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आई-वडीलांचे स्वप्न आणि शाळेचे नाव रोशन करण्यासाठी जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर प्रत्येक स्पर्धा जिंकण्याच्यासाठी प्रयत्न करत असल्याचे हर्षवर्धन जाधवने सांगितले. यशाबद्दल हर्षवर्धन जाधव व त्यांचे वडील आंबादास जाधव यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

