शहरात राबवली जाणार गोवर रूबेला लसीकरण मोहीम – आयुक्त श्रीमती मानसी
लातूर ;- शहरातील सर्व शासकीय/ विनाअनुदानित/अनुदानित आश्रम शाळा व मदरसा येथील पाच ते पंधरा वयोगटातील मुला मुलींना १५ ते ३० सप्टेंबर दरम्यान गोवर रूबेला लसीची मात्रा देण्यात येणार आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सदर बैठकीमध्ये आयुक्त श्रीमती मानसी यांनी शासन स्तरावरून प्राप्त उद्दिष्ट १००% पुर्ण करणे बाबत सूचना दिल्या. सदर बैठकीस लातूर शहरातील मदरसा यांचे संचालक, आय एम ए अध्यक्ष डॉ अभय कदम, आय ए ए पी अध्यक्ष डॉ बजाज, स्त्री रुग्णालयातील डॉ नारागुडे, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्विलन्स मेडिकल ऑफिसर डॉ गायकवाड, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शंकर भारती, महापालिकेचे आरसीएच ऑफिसर डॉ श्यामा जाधव तसेच नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
अशी असणार आहे गोवर रूबेला लसीकरण मोहीम
१. लसीकरण सत्रात एकूण सहा कर्मचाऱ्यांचा समावेश त्यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी १ ए एन एम, १ स्टाफ नर्स, ३ अशा स्वयंसेविका, असे एकूण सहा जणांचा एक चमू लसीकरणाचे कामकाज पाहणार आहे.
२. प्रामुख्याने ५ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना या लसीची एक मात्रा दिली जाणार आहे.
३. एक लसीकरण सत्रा मध्ये १५० मुलांना लसीची मात्रा देण्यात येणार आहे
४. केवळ प्रशिक्षित व्यक्तीच लसीकरण सत्रामध्ये लस देणार आहेत.
शहरातील एकही पात्र बालक या लसीपासून वंचित राहणार नाही असा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
शाळेतील शिक्षक, पालक यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मोहीम यशस्वी करण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शंकर भारती यांनी केले आहे.
