• Mon. Aug 18th, 2025

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठीअद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा-माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Aug 18, 2025

ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक उत्पादन व कमी खर्चासाठी
अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

ट्वेंटीवन शुगर्सच्या वतीने आयोजित ऊस पीक परिसंवाद व हार्वेस्टर
प्रशिक्षण उपक्रम संपन्न

लातूर प्रतिनिधी :

ऊस हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे पीक
असून,शेतकरी,कर्मचारी,कामगार,मजूर सर्वांनी मिळून साखर उद्योगातील
आव्हानांना तोंड द्यावे.ऊस लागवडीपासून तोडणी आणि गाळपापर्यंत अधिक
उत्पादन व कमी खर्चासाठी प्रत्येकाने अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा
असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा
लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले आहे .

ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार, दि. १५ ऑगस्ट
२०२५ रोजी सकाळी  लातूर शहरातील हॉटेल वैष्णव येथे सर्व युनिटच्या
कर्मचाऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद आणि हार्वेस्टर मशीन प्रशिक्षण उपक्रम
आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाला ट्वेंटीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन
विजय देशमुख,ऊस तज्ञ सुरेश माने पाटील विलास सहकारी साखर कारखान्याचे
कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील,जनरल मॅनेजर संतोष बिराजदार,तसेच श्री.
सुभाष पाटील, श्री. सुभाष सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख म्हणाले की “विकासरत्न
विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार दशकांत ऊस क्षेत्रात
मोठे काम झाले. विकासरत्न विलासराव देशमुख ‘मांजरा’ साखर कारखान्याने
देशात पहिल्यांदाच १०० टक्के हार्वेस्टरने ऊसतोड केली आहे. या उपक्रमाचे
श्रेय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना जाते. हार्वेस्टर
कर्मचाऱ्यांनी उत्तम काम केले तर त्यांना कायम नोकरीत सामावून घेऊ.जगात
जे झाले नाही ते आपण लातूरमध्ये करून दाखवू,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ऊस तज्ञ सुरेश माने पाटील यांनी ऊस
जातींची ओळख, लागवड, खोडवा व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, तसेच पाणी
व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.विलास सहकारी साखर
कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी नोंदणी, ऊस बियाणे
व्यवस्थापन, अंतर मशागत, ऊस तोडणी आदी विषयांवर माहिती दिली.तर न्यू
हॉलंड हार्वेस्टर कंपनीचे सुवर्णसिंग पाटील व सागर कदम यांनी मशीनविषयक
प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या
प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
हार्वेस्टर ऑपरेटर व चालकांसाठी तयार केलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेचे
विमोचन आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते झाले. तसेच गेल्या गळीत हंगामात
सर्वाधिक तोडणी व वाहतूक करणाऱ्या हार्वेस्टर व्यवस्थापक, ऑपरेटर आणि
चालकांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी आभार
एस.आर.केळकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *