नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या चीन संबंधीच्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने ‘तुम्ही खरे भारतीय असता तर…’ अशी टीप्पणी केली. यानंतर काँग्रेस महासचिव खासदार प्रियंका गांधी या बंधू राहुल गांधी यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत. “सरकारला प्रश्न विचारणे हे विरोधी पक्षनेत्याचे कर्तव्य आहे. माझ्या भावाने कधीही भारतीय सैन्याबद्दल शंका घेतली नाही, त्यांचा सन्मानच केला आहे. माझ्या भावाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला,” असे म्हणत प्रियंका यांनी राहुल गांधींची पाठराखण केली आहे.
खरा भारतीय कोण हे न्यायालय ठरवू शत नाही – प्रियंका गांधी
राहुल गांधी यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या टिप्पणीवर 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने, चीनने भारताच्या दोन हजार चौरस किलोमीटर भूमिवर कब्जा केल्याचे तुम्हाला कसे कळले? तुम्ही तिकडे होतात का? तुमच्याकडे याची काही विश्वसनीय माहिती आहे का? नसेल तर तुम्ही अशी वक्तव्ये का करता? असा सवाल करतानाच तुम्ही खरे भारतीय असता तर तुम्ही सीमा संघर्ष आणि भारतीय लष्कराविषयी अशी वक्तव्ये केली नसती, अशा कठोर शब्दात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सुनावले. या संबंधी विचारलेल्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, “राहुल गांधी लष्कराच्याविरोधात कधीही बोलू शकत नाहीत. राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे. सन्माननीय न्यायाधीशांचा पूर्ण आदर करत सांगू इच्छिते की, कोण खरा भारतीय आहे, हे ते ठरवू शकत नाहीत.”
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत या मुद्यावर म्हटले की, “सर्वोच्च न्यायालयाकडून यापेक्षा मोठी चपराक असू शकत नाही. “16 डिसेंबर 2022 रोजी भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी म्हटले होते की, लोक भारत जोडो यात्रेबद्दल विचारतील, मात्र चीनने दोन हजार वर्ग किलोमीटर भारतीय जमीनीवर कब्जा केला आहे. 20 भारतीय सैनिकांना मारले आणि आमच्या सैनिकांना अरुणाचलमध्ये मारझोड होत आहे. त्याबद्दल कोणी बोलणार नाही.”
