नागपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरु आहे. यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं. यावेळी विरोधकांना बोलू दिलं जात नाही, असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं. यावेळी जयंत पाटील यांच्याकडून अध्यक्षांना उद्देशून असंविधानिक शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.
विधानसभा अध्यक्ष काय म्हणाले?
जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत अपशब्द वापरून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली. सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला. त्यांच्या अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष केल्यास चुकीचा पायंडा निर्माण होईल. सदस्यत्व रद्द करण्याचे ठराव आला आहे, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. मुंबई व नागपूर येथील विधिमंडळाच्या परिसरात बंदी घालण्यात आली आहे.
अजित पवार काय म्हणाले
“अनेक वर्षे सभागृहात काम करतो, असे वक्तव्य अजाणतेपणाने जाऊ नये अशा विचारांचे आम्ही आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती करून मार्ग निघावा यासाठी प्रयत्न केला. सदस्यांच्या भावन तीव्र आहेत. असा शब्दप्रयोग झाला त्याबद्दल मी स्वत: दिलगिरी व्यक्त करतो. अध्यक्षांबद्दल आदराची भावना आहे, यापुढेही हीच भावना ठेवू” असे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सांगितल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला