• Sun. Aug 3rd, 2025

निमिषा प्रियाची फाशी कशी टळली? लवकरच भारतात परतण्याची शक्यता

Byjantaadmin

Jul 29, 2025

मुंबई: येमेनमध्ये फाशीची शिक्षा मिळालेल्या नर्स निमिषा प्रिया हिला जीवनदान मिळाले आहे. तिला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता निमिषा पुन्हा भारतात परतण्याची शक्यता  निर्माण झाली आहे. येमेनमध्ये तिच्या बिझनेस पार्टनरच्या हत्येप्रकरणी नर्स म्हणून काम करणाऱ्या  निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. भारताने या प्रकरणी मध्यस्थी करत तिला झालेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. या प्रयत्नांना यश आल्यानंतर तिची शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते, जे यशस्वी ठरले आहेत.  भारतीय ग्रँड मुफ्ती कंथापुरम एपी अबूबक्कर मुसलियार यांच्या कार्यालयाने निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द झाल्याची माहिती दिली आहे.

निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द कशी झाली ?

भारतीय ग्रँड मुफ्ती कंथापुरम एपी अबूबक्कर मुसलियार यांच्या कार्यालयाने एका अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘निमिषा प्रियाची फाशीची शिक्षेला याआधी स्थगिती देण्यात आली होती आता ही शिक्षा रद्द करण्यात आली आहे.  सना येथे झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.’ ग्रँड मुफ्तींनी तिची शिक्षा रद्द व्हावी यासाठी प्रयत्न केले होते.  ANI ने या संदर्भातील वृत्त दिले आहे. 

निमिषा प्रियाने नेमके काय केले होते ?

37 वर्षीय निमिषा प्रिया केरळची रहिवासी आहे. ती येमेनमध्ये नर्स म्हणून काम करत होती. निमिषा प्रियाने 2015 मध्ये येमेनमध्ये स्थानिक नागरिक तलाल अब्दो महदी याच्यासोबत एक क्लिनिक उघडले होते. परदेशी नागरिक तिथे व्यवसाय करू शकत नसल्यामुळे हा एक कायदेशीर मार्ग होता. मात्र लवकरच या सगळ्या प्रकरणाने एक भयानक वळण घेतले होते.  तलाल अब्दो महदीने निमिषाचे शोषण करण्यास सुरुवात केली होते. त्याने तिचा पासपोर्ट आणि व्हिसा आपल्या ताब्यात घेतला होता आणि तो तिचा सातत्याने छळ करत होता. तलालने निमिषाच्या मदतीने सुरू केलेल्या क्लिनिकवर पूर्ण ताबा मिळवला होता.  तलालने निमिषाचे आर्थिक शोषण करण्यासही सुरूवात केली होती. तो तिला मारहाण करू लागला आणि हा छळ निमिषाला असह्य होत चालला होता. निमिषा भारतातही पळून येऊ शकत नव्हती कारण तिचा पासपोर्ट त्याच्या ताब्यात होता. या सगळ्या छळातून सुटका मिळवण्यासाठी निमिषाने एक प्लॅन तयार केला होता. तिने तलालला बेशुद्ध करून त्याच्याकडील पासपोर्ट आणि बाकी कागदपत्रे घेऊन पळ काढायचं ठरवलं होतं. मात्र गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस झाल्याने तलाल मेला होता. याच प्रकरणात तलालला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

कोण आहे निमिषा प्रिया ?

निमिषा प्रिया ही मूळची केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी आहे. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2011 मध्ये ती येमेनला गेली होती. निमिषाचे आई-वडील मजुरी काम करत होते आणि आपल्या मुलीला परदेशात नोकरीला पाठवता याने यासाठी त्याने प्रचंड कष्ट केले होते. निमिषाचा नवरा केरळमध्येच राहतो आणि या दोघांना एक मुलगीही आहे. तिची फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी तिच्या आईने आणि भारत सरकारने बरेच प्रयत्न केले होते.  
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *