जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत MAHARASHTRAच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दिव्याने कोणतीही चूक न करता हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेला. टायब्रेकरमध्ये काळ्या मोहरांवर खेळताना दिव्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत निर्णायक विजय मिळवला.
सामन्यात एक क्षण असा आला होता, जिथे हम्पीकडे पुन्हा सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र, ती त्या संधीचं रूपांतर विजयात करू शकली नाही. दुसरीकडे, दिव्याने कोणताही चुक न करता ऐतिहासिक कामगिरी केली आणि महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला.
टायब्रेकर म्हणजे काय? सामना कसा खेळला जातो?
जर अंतिम फेरीतील सामन्यात दोन्ही खेळाडूंचा स्कोअर बरोबरीत राहिला, तर निकाल लागण्यासाठी टायब्रेकर राउंड खेळवले जातात. या टायब्रेकरमध्ये प्रत्येक खेळाडूला 15-15 मिनिटे दिली जातात आणि प्रत्येक चालीनंतर 10 सेकंद वाढवले जातात, जर स्कोअर अजूनही बरोबरीत राहिला असता, तर पुन्हा एकदा 10-10 मिनिटांचे आणखी एक सेट खेळवले गेले असते, त्यातही प्रत्येक चालीनंतर 10 सेकंद मिळाले असते. पण या सगळ्याची गरजच पडली नाही, कारण दिव्याने पहिल्याच टायब्रेकरमध्ये हम्पीला मात दिली आणि थेट विजेतेपदावर कब्जा केला.
विजयानंतर भावुक झाली दिव्या देशमुख
NAGPURची 19 वर्षांची दिव्या देशमुख आता केवळ वर्ल्ड कप विजेतीच नाही, तर तिने या ऐतिहासिक विजयासोबत ग्रँडमास्टरचा मानही मिळवला आहे. या क्षणी दिव्या खूपच भावूक झाली होती. तिच्यासाठी हे आयुष्यातलं अविस्मरणीय क्षण ठरले. विशेष म्हणजे, दिव्या आधीच ‘कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरली आहे, जे बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या वाटचालीतलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.
दिव्या देशमुखला भव्य पारितोषिक, कँडिडेट्स स्पर्धेसाठीही तिकीट!
महिला वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या दिव्या देशमुखला विजेतेपदाबरोबरच सुमारे 42 लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. उपविजेती कोनेरू हम्पी हिला 35,000 डॉलर्स म्हणजेच सुमारे 30 लाख रुपये मिळाले. या दोन्ही खेळाडूंनी बुद्धिबळातील अत्यंत प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्रता मिळवली आहे, जे विश्वविजेतेपदाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जातं. भारतामध्ये बुद्धिबळाचं क्रेझ वेगाने वाढत आहे, आणि त्यामुळे या दोघींनाही नवीन स्पॉन्सर्स, ब्रँड डील्स आणि व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता प्रचंड आहे. भारताची बुद्धिबळाची दुनिया आता नवी दिशा घेत आहे, आणि दिव्या देशमुख या प्रवासाची आघाडीची खेळाडू ठरली आहे.
