सोलापूर:-लग्नासाठी मुलगीच मिळत नसल्याने ‘मुलगी द्या हो’अशी मागणी करीत २५ पेक्षा अधिक तरुणांनी बुधवारी सोलापुरात चक्क मोर्चा काढला. मंुडावळ्या, फेटे, कोट असा नवरदेवाचा वेश परिधान करून बँडबाजासह निघालेली ही लग्नाळू तरुणांची वरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चाैकातून सुरू झाली. ती जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात आला.
नवरदेवाच्या वेषात तरुणांची जिल्हा कचेरीवर ‘वरात’
लग्नासाठी मुलगी मिळेल का? या मागणीसाठी भावी नवरदेवांची मुंडावळे, फेटा घालून बँड बाजा वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नव्हे तर घोड्यावर बसून वरात काढण्यात आली. महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात आला. विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये या मोर्चात सहभाग नोंदवला आहे. संघटनेचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी या अनोख्या मोर्चाचे नेतृत्व केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
लग्नाळू तरुणांनी स्वतः नवरदेवाचा पोशाख परिधान करून, डोक्याला मुंडावळ्या आणि फेटा बांधून, हातात कट्यार घेऊन आणि घोड्यावर विराजमान होऊन मोर्चा काढला. वाजंत्रीसह निघालेल्या या मोर्चात २५ पेक्षा जास्त घोड्यांवर तरुण बसले होते. त्याहून अधिक तरुण नवरदेव होऊन पायी चालत होते. महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायको मिळावी यासाठी सरकारने गर्भलिंग निदान चाचणी थांबवण्याचा निर्णय घ्यावा, यामुळे मुलींचे प्रमाण कमी होत आहे या प्रमुख मागणीसाठी हा आगळावेगळा मोर्चा काढण्यात आला होता.
संघटनेचे नेते बारसकर म्हणाले, युवकांना लग्नाला मुलगी मिळत नसेल तर काय करावे, आई वडील वैतागले, मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत त्याचे प्रमाण मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत खूप कमी आहे. लग्न न होणे ही एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे. यामुळे समाजात अनुचित प्रकारामध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे अनेक आई-वडिलांना व्याधी जडत आहेत. या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी ही मागणी बारस्कर यांनी यावेळी केली.
हजार मुलांमागे ९२९ मुली
२०२२ च्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ हजार मुलांमागे ९२९ मुली आहेत. ग्रामीणमध्ये हे प्रमाण ९५२ तर शहरात ९०३ इतके आहे. २०११ च्या जनगणनेनुसार ९२२ इतका होता, त्यात आता वाढ होऊन ९२९ इतका झाला आहे.