छत्रपती संभाजीनगर:
महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या मासिक बैठकीत चांगलाच राडा झाला. छत्रपती संभाजीनगरच्या वक्फ बोर्ड कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा गोंधळ झाला. प्रत्येक महिन्यात दोन दिवस महाराष्ट्र वक्फ बोर्डची बैठक असते. या बैठकीदरम्यान पुण्याच्या सलीम मुल्ला यांना काही अज्ञात व्यक्तींनी मीटिंग हॉलच्या बाहेर मारहाण केली असल्याचा आरोप आहे.
काय आहे प्रकरण?
सलीम मुल्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊसमध्ये महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्डाची बैठक सुरू होती, ज्यामध्ये वक्फ बोर्डाशी संबंधित प्रकरणांची सुनावणी चालू होती. सलीम मुल्ला एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी मीटिंग हॉलमध्ये जात असताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या नाकातून आणि चेहऱ्यावरून रक्त वाहू लागले.
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच सलीम मुल्ला यांना वक्फ बोर्डाच्या मीटिंग हॉलमध्ये बसवण्यात आले आणि सर्व सदस्यांनी त्यांच्या सोबत चर्चा केली.या प्रकरणाबाबत बोलताना सलीम मुल्ला म्हणाले की, पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे 21 एकरची एक वक्फची जमीन आहे. या जमिनीची सेल डीड 2006 मध्ये झाली होती. ही जमीन ज्या लोकांनी विकली, तेच लोक आता ट्रस्टी बनण्याचा प्रयत्न करत आहेत. हे प्रकरण त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्डाकडे तक्रार दाखल केली. याच जमिनीच्या सुनावणीसाठी ते आले होते. मात्र त्यांना मारहाण करण्यात आली.

सलीम मुल्ला यांचा आरोप आहे की, ज्यांनी त्यांच्यावर हल्ला केला ते सर्वजण वक्फच्या जमिनीवर अतिक्रमण करणारे ‘जमीन माफिया’ आहेत. सलीम मुल्ला हे महाराष्ट्र स्टेट वक्फ बोर्ड लीगल टास्क फोर्सचे अध्यक्ष असून, जिथे जिथे वक्फच्या जमिनीवर अतिक्रमण होतं, तिथे ते आवाज उठवत असतात. त्यामुळेच सूडबुद्धीने त्यांच्यावर हल्ला झाला असावा. या प्रकरणात त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधील बेगमपुर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे.