जालना : जिल्ह्यातील जालना मतदारसंघातील काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. भाजपच्या बड्या नेत्याच्या ते संपर्कात असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ते भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस नेतृत्वा विरोधात उघड भूमिका घेतली होती. त्यामुळे, लवकरच ते CONGRESSS बाय-बाय करतील, अशी चर्चा मतदारसंघात रंगली होती. मात्र, ते कुठल्या पक्षात जाणार याबाबत गुप्तता होती, अखेर त्यांनीही BJP जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
कैलास गोरंट्याल यांची आता नव्याने भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून त्यांनी आपल्या शेरो शायरीमधून भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. आता माघार नाही, लवकरच पेढे भेटणार म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत मी रनिंग आमदार असताना फर्स्ट लॉटमध्ये मला तिकीट दिले नाही, तो उशीर केल्यामुळे रिझल्ट निगेटिव्ह झाला. याशिवाय मला पक्षाने फक्त तिकीट दिले, नेत्यांची सभा दिली नाही आणि राजकारणामध्ये द्यावं लागतं, करावं लागतं, ते काहीही दिलं नाही, असे कैलास गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं.
कब का टूथ चुका था मैं,
बस बिखरना है मुझे…
तुम्हारे हजारो साल से मेरी खामोशी सही,
न जाने कितने राजो को पर्दा रखती है..!
अशी भन्नाट शायरी करत कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेस सोडून भाजपातील प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मला पक्षाने फक्त तिकीट दिले बाकी, काही नाही. फक्त तिकीट देऊन वाऱ्यावर सोडले, अशी टीका देखील त्यांनी काँग्रेस नेतृत्वावर केली. दरम्यान, मी एकदा बोललो की बोललो, आता पाच वर्षे वाट बघणार नाही असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतरच पक्षांतराचे संकेत दिले होते. जालन्यामध्ये आपल्याच माणसांनी घात केल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी माझं झालं, 2029 तुमचं असं होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतोय असा सल्ला गोरंट्याल यांनी जालन्याचे खासदार कल्याण काळे यांना दिला होता. खासदार कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली होती. तेव्हापासून कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरत होती.
