विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी जोरदार राडा झाला होता. जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडाळकर या दोन आमदारांचे कार्यकर्ते एकमेकंना भिडले. त्यांच्यात झालेल्या हाणामारीचे पडसाद आज (शुक्रवार) उमटले. हा सर्व राडा अतिशय गंभीर असल्याचं मत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलं आहे.
हे प्रकरण अत्यंत गंभीर असून विधीनंडळाची उच्च परंपरा आणि प्रतिमा राखणे हे आमदारांचे कर्तव्य आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर या प्रकरणानंतर संसदेच्या धर्तीवर आमदार नीतीमुल्य समिती स्थापन करण्याचा विचार सुरु असून त्याबाबत 1 आठवड्यात निर्णय होईल, असे नार्वेकर यांनी सांगितले. त्याचबरोबर अधिवेशन कालावधीमध्ये विधिमंडळ परिसरात सदस्य, त्यांचे अधिकृत पीए, अधिकारी यांनाच प्रवेश दिला जाईल. अन्य प्रवेश दिले जाणार नाहीत. मंत्र्यांनी अधिवेशन कालावधीमध्ये ब्रिफिंग हे मंत्रालयात घ्यावे, असे स्पष्ट निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. कोणत्याही अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
नितीन देशमुख आणि सर्जेराव टकले यांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा मलिन करणारे आहे. त्यांनी सभागृहाचा अवमान केला आहे. त्या विरोधातील प्रकरण विशेषाधिकार समितीकडे जाईल, असंही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडाळकर यांनी अभ्यागतांना आणले त्याबाबत त्यांच्या कृतीबाबत सभागृहात खेद व्यक्त करावा, असे आदेशही नार्वेकर यांनी केला.
काय आहे प्रकरण?
गुरुवारी विधानभवनातच जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यामुळे विधीनभवनात जोरदार गोंधळ निर्माण झाला होता.. हा राडा इतका जोरदार होता की कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे ही फाडले. उपस्थित असलेल्या काही नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर कार्यकर्त्यांना पांगवण्यात आलं. यापूर्वी बुधवारी जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्यात वाद झाला होता. शिवाय शाब्दीक चकमक ही झाली होती. त्याचेच रुपांतर गुरुवारच्या राड्यामध्ये झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. नार्वेकर यांनी या प्रकरणात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हा अहवाल सादर झाल्यानंतर नार्वेकरांनी आज (शुक्रवार) या प्रकरणावरील निर्णय जाहीर केला.
