ए झोनच्या क्षेत्रीय कार्यालयास मनपा आयुक्तांची अचानक भेट
लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिकेच्या ए झोन कार्यालयास आयुक्त श्रीमती मानसी यांनी बुधवारी (दि. १६)अचानक भेट देऊन पाहणी केली. या भेटीत आयुक्तांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या .नागरिकांकडून येणाऱ्या अडचणींचा किती दिवसात निपटारा होतो ? याची माहिती घेतली. वसुलीचाही आढावा घेतला. पाणी, कचरा, वीज, रस्त्यावरील खड्डे या संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निवारण करावे. नागरिकांना मूलभूत सुविधा लवकरात लवकर मिळतील यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेत मिळावे असेही त्या म्हणाल्या.
ए झोन क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीवर कार्यवाही करावी. अतिक्रमणावर कार्यवाही करावी तसेच प्रभागातील सर्व घरामध्ये दररोज घंटागाडी जाते का? याची पाहणी करावी अशा सूचना त्यांनी केल्या. घंटागाडीमार्फत ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित होतो का? याची तपासणी करावी. प्रभागात जिथे नेहमी कचरा पडतो त्या ठिकाणांची पाहणी करून उपाययोजना कराव्यात. अतिवृष्टी झाल्यास जेथे पाणी तुंबून राहते ती ठिकाणे पाहून त्यावरील उपाययोजना कराव्यात. वादळी वाऱ्यामुळे मुख्य रस्ते,विजेच्या तारा आदीवर झाडे कोसळून वीज पुरवठा विस्कळीत होतो. वाहतूक खोळंबते.अशावेळी वाहतूक तसेच वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय ठेवून तात्काळ उपाययोजना कराव्यात, असेही आयुक्त म्हणाल्या.कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित रहावे असे सांगून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.
