सांगली: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शपचं पानीपत झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रदेशाध्यक्ष बदलला आहे. जयंत पाटील यांना पदमुक्त करत शशिकांत शिंदे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहेत. आता ते प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार झाल्यानं या चर्चांनी अधिक जोर धरला आहे.
जयंत पाटील यांना आता नरेंद्र मोदी सरकारच्या योजना आवडू लागल्याचं मिश्किल विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधी बाकांवर बसलेले जयंत पाटील कोणत्याही मुद्द्यावर विशेष आक्रमक झालेले नाहीत. मस्साजोगपासून मराठी भाषेच्या मुद्द्यापर्यंत त्यांनी बाळगलेलं मौन लक्षवेधी आहे. विधानसभेत त्यांनी कधीही सरकारची कोंडी केलेली नाही. त्यामुळे ते भाजपमध्ये जातील अशी अटकळ आहे.जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध उत्तम आहेत. फडणवीस अर्थमंत्री असताना जयंत पाटील यांच्याकडून अर्थसंकल्पातील खाचाखोचा जाणून घेतल्या. पाटील यांच्यामुळे फडणवीस यांना अर्थसंकल्पातील अनेक किचकट गोष्टी समजल्या. जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. शांत, संयमी असलेले जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांना पक्षात हवे आहेत.आपण भाजप मध्ये जायचं का, पक्षांतर केल्यास काय होईल, याचा आढावा घेण्यासाठी जयंत पाटील यांनी मध्यंतरीच्या काळात एक सर्व्हे केल्याची माहिती सांगलीतील सुत्रांनी दिली. विशेष म्हणजे या सर्व्हेतून समोर आलेला तपशील पाटलांसाठी सकारात्मक आहे. पाटील प्रदिर्घकाळ सत्तेत राहिले आहेत. त्यांचे पुत्र प्रतीक पाटील अद्याप राजकारणात स्थिरस्थावर झालेले नाहीत. पक्षांतर केल्यास, भाजपमध्ये गेल्यास भविष्य उज्ज्वल असेल, असं सर्व्हे सांगतो. त्यामुळे पाटील भाजप प्रवेशाबद्दल सकारात्मक असल्याचं समजतं.भाजपमध्ये प्रवेश केल्यावर लगेच मंत्रिमंडळात वर्णी लागावी आणि महत्त्वाचं खातं मिळावं, यासाठी पाटील आग्रही आहे. पाटबंधारे किंवा ऊर्जा खात्यासाठी पाटील विशेष आग्रही आहेत. त्यावर तुम्ही आधी पक्षात या. थोडा संयम ठेवा. काही महिने धीर धरा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर तुम्हाला संधी देऊ, असा शब्द फडणवीस यांनी पाटलांना दिल्याचं समजतं.

२०२९ मध्ये भाजपला स्वबळावर निवडणुका लढवायची आहे. त्या अनुषंगानं फडणवीस विरोधी पक्षातील शक्तिशाली नेत्यांना सोबत घेत आहेत. २०२९ साठी मराठा नेत्यांची फळी उभारण्याचे आदेश दिल्लीतील नेतृत्त्वानं फडणवीस यांना दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख मराठा नेते अशी जयंत पाटील यांची ओळख आहे. त्यामुळे पाटील भाजपमध्ये आल्यास पक्ष पश्चिम महाराष्ट्रात बळकट होतो.
२०२९ नंतर कदाचित फडणवीसांना दिल्लीला जावं लागू शकतं. फडणवीस यांनी तशी कल्पना जयंत पाटील यांना दिली आहे. मला दिल्लीला जावं लागल्यास तुम्हाला महाराष्ट्रात चांगली संधी असेल, असं फडणवीस यांनी पाटलांना सांगितल्याची माहिती सांगलीतील सुत्रांनी दिली. त्यामुळे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे.