निलंगा मतदारसंघातील विविध कामांसाठी 60 कोटीच्या निधीस मंजूरी:आ. संभाजी पाटील निलंगेकरांचा पाठपुरावा
निलंगा/प्रतिनिधी ः- निलंगा मतदारसंघातील विविध विकास कामांना चालना मिळावी आणि त्यासाठी निधी मंजूर व्हावा याकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर सातत्याने प्रयत्न करत पाठपुरावा करीत असतात. या पाठपुराव्याने मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी 60 कोटी 47 लाख रूपयांच्या निधीस मंजूरी प्राप्त झाली आहे. हा निधी नाबार्ड, केंद्रीय रस्ते विकास निधीतून प्राप्त होणार असून यासंदर्भात हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळालेली असून लवकरच ही कामे सुरु होणार आहेत.
निलंगा मतदारसंघात गुणवत्तापुर्ण आणि उच्चदर्जाचे रस्ते व्हावेत याकरीता आ. संभाजी पाटील निलंगेकर आग्रही असतात. या रस्त्यांच्या माध्यमातून मतदारसंघात विकासाला चालना मिळते त्यामुळेच विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध व्हावा याकरीता आ. निलंगेकर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या पाठपुराव्यातून केंद्रीय रस्ते विकास निधीअंतर्गत लामजना-निलंगा-भालकी या रस्त्यासाठी 10 कोटी रूपय मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील तुपडी ते हाडगा, मुदगड (एकोजी) ते ताडमुगळी या रस्त्यांसाठी 10 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. तसेच या निधीतून बोरसुरी गावाजवळ पुलाचे बांधकामही करण्यात येणार आहे. यासह निलंगा तालुक्यातील निटूर ते हेळंब या रस्त्यांसाठी 20 कोटी रूपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. नाबार्डच्य माध्यमातून लातूर-सोनवती-मुशिराबाद-शिरुर अनंतपाळ, तळेगाव-देवणी या रस्त्यांसाठी 3 कोटी रूपय तर निलंगा तालुक्यातील अनसरवाडा-सोनखेड-सावरी व तगरखेडा-हालसी या रस्त्यांसाठी 2.50 कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या रस्तेकामांच्या निधीसह निलंगा येथे महसुल अधिकारी व कर्मचार्यांची निवासस्थाने उभारण्यासाठी 14 कोटी 97 लाख रूपय निधी मंजूर झालेला आहे.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान या निधीस मंजूर मिळाली असून लवकरच या निधीच्या माध्यमातून सदरील कामे सुरु होतील अशी माहिती माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे. निलंगा मतदारसंघात अधिकाधिक विकासकामे होण्यासाठी आ. निलंगेकर सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करत असून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी प्राप्त होत आहे. आगामी काळातही निधीचा ओघ कायम सुरु राहून निलंगा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.