• Thu. Jul 17th, 2025

आता ‘कोळी महादेव’ समाज करणार अन्नत्याग उपोषण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Byjantaadmin

Jul 16, 2025

आता ‘कोळी महादेव’ समाज करणार अन्नत्याग उपोषण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जात प्रमाणपत्र सुलभतेने देण्यास उपविभागीय अधिकाऱ्याची टाळाटाळ 

……..

निलंगा (प्रतिनिधी) : निलंगा विधानसभा मतदारसंघातील कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नसल्यामुळे प्रलंबित प्रकरणाचा व नवीन दाखल केलेल्या जातीच्या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित टीसी आधारे दाखले द्यावे अन्यथा सोमवार दि: 21 पासून उपविभागीय कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा सकल आदिवासी कोळी महादेव समाज संघर्ष समितीचे नेते चंद्रहास नलमले यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, मागील ११ महीण्यापूर्वी निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांनी कोळी महादेव जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून आपल्या कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत. परंतु सदर प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याकडून पन्नास वर्षांपूर्वीचा पुरावा अथवा वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीचा शेरा मारून हजारो प्रकरणे प्रलंबित ठेवले आहेत. हा प्रकार शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे राज्य शासनाच्या सेवा हमी कायद्याचेही उल्लंघन होत असून संबंधित अर्जदारास त्रुटींची पुर्तता कळवणे अवश्यक असतांना जाणूनबुजून हेतू पुरस्कृत याप्रकरणी दुर्लक्ष केले आहे.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले असून अनेक वेळा लेखी व तोंडी माहिती कळवली आहे. परंतु संबंधित अधिकाऱ्याकडून याकडे दुर्लक्ष केले आहे.

निलंगा मतदार संघातील अनेक गावात ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी सुटलेले असून यापूर्वी कोणतेही पुरावे न मागता यापूर्वी ‘कोळी महादेव’ जमातीचे हजारो जात प्रमाणपत्र  वितरित केले आहेत. परंतु केवळ ‘कोळी महादेव’ समाजासाठी सध्या  अतिरिक्त पुरावे मागून जातीच्या दाखल्याची प्रकरणे प्रलंबित ठेवले जात आहेत व शासन निर्णयाचे उल्लंघन केले जात आहे. कोळी महादेव जमातीचे दाखले न देणे, गरज नसताना पुरावा मागणे, वैधता प्रमाणपत्र सरसकट मागणे, सेवा हमी कायद्याचे उल्लंघन करणे या गंभीर बाबी असून जात प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे म्हणून यापूर्वी कोळी महादेव समाजाकडून दंडवत आंदोलन, जलसमाधी आंदोलन, मुंडन आंदोलन असे आगळे वेगळे आंदोलन करून या समाजाने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता परत प्रलंबित दाखले व नवीन दाखल होणारे प्रमाणपत्र सुलभतेने देण्यात यावे अन्यथा २१ जूलैपासून आपल्या कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन त्यांनी दिले आहे निवेदनावर चंद्रहास नलमले, हरिश्चंद्र मुडे, व्यंकटराव वाघमारे, तमा माडीबोणे,  तानाजी बळदे, प्रकाश कलबोने, नरसिंग मुडे, तानाजी घंटे, बालाजी पोतराजे, भरत डोपेवाड, बालाजी औटी यासह आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *