अक्कलकोट येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना, काही लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येऊन काळी शाई फेकली आणि त्यांना खाली ओढून मारहाण केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित ‘शिवधर्म फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दीपक काटे(भाजप युवा मोर्चा – राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी दोन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, भाजपचा संबंध आहे. ते जे आरोपी आहेत सगळे ते भाजप नेत्यांच्या आसपास असल्याचे व्हिडिओ आणि फोटो आले आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही डाव्या विचारसरणीवरती दोष देत आहात. डावी विचारसरणी अमुक आणि तमुक. मग काल प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला, ज्या पद्धतीने हल्ला झाला हे भारतीय जनता पक्षाने पोसलेलेच डावे होते. आता या लोकांवर जनसुरक्षा कायदा लावणार आहात का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचं गुंड राष्ट्र करून टाकलंय
संजय राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कुठेही कोणीही कोणाला मारत आहे. सामाजिक कार्यकर्त्याला, राजकीय कार्यकर्त्याला बाहेर फिरायला भीती वाटते. या भाजपच्या गुंड टोळ्या कधी कोणावर हल्ला करतील, याचा भरोसा नाही. गुंड राष्ट्र फडणवीस यांच्या राज्यात करून टाकला आहे. जसं आमच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यांवर पीएमएलए कायद्याअंतर्गत खोटे गुन्हे दाखल केले, बनावट पद्धतीने संबंध जोडले गेले. तोच जन सुरक्षा कायदा आहे. तुमच्या सरकारमध्ये एवढी हिंमत आहे आणि तुम्ही एवढे पोलीस पोसलेले आहात. खाकी वर्दीतले अतिरेकी तुम्ही पोसलेले आहेत. खाकी वर्दीतले नक्षलवादी तुमच्याकडे आहेत. ते कोणाचाही संबंध कोणाशी जोडतील. देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कसं करावं आणि कसं केलं जातं हे जेवढं त्यांना त्यांना माहिती आहे, तेवढं माझ्यासारख्या माणसाला सत्ता न भोगताही हे कसे एक असं राज्य करत आहेत हे मी सांगू शकतो, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
