• Mon. Jul 14th, 2025

प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न, विधानसभेत विजय वडेट्टीवारांचा आरोप

Byjantaadmin

Jul 14, 2025

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे काळी शाई फेकून हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाज आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले असताना, काही लोकांनी त्यांच्या गाडीसमोर आक्रमकपणे येत काळी शाई फेकली व त्यांना गाडीतून खाली ओढून मारहाण केली होती. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित ‘शिवधर्म फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दीपक काटे (भाजप युवा मोर्चा – राज्य सचिव), किरण साळुंखे, भवानेश्वर शिरगिरे यांच्यासह एकूण सात जणांविरोधात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रवीण गायकवाड हे कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांचा काय दोष होता? कुठले कारण असावे? त्यांच्या संस्थेचे नाव संभाजी आहे, इतकेच कारण होते. अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहे. त्यांना मारहाण झाली का?  ही संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचार प्रणालीवर काम करणारी आहे. परंतु ज्या पद्धतीने हल्ला झाला, त्यांना अमानुषपणे गाडीतून उतरवून काळे फासण्यात आले. नुसते काळे फासले नाहीतर कॉलर धरून ओढून खाली पाडले, असे त्यांनी म्हटले. 

प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला : विजय वडेट्टीवार 

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ज्या माणसाने हे कृत्य केले त्याचा उद्देश काय होता? त्या माणसाची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. पिस्तूल बाळगल्याच्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. सख्या चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी तो जेलमध्ये होता. प्रवीण गायकवाडांचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारहाण करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. ज्यावेळी असे कार्यक्रम होतात तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. 

योग्य ती कारवाई केली जाईल : देवेंद्र फडणवीस 

यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी स्वतः या प्रकरणाची पूर्ण माहिती घेतली आहे. ही वस्तुस्थिती आहे की, ज्या आरोपींनी हल्ला केला त्यांनी तुम्ही संभाजी नाव काय ठेवलं? छत्रपती संभाजी का ठेवलं नाही? अशा प्रकारचा वाद तयार करून त्यांच्यावर शाई फेकली. पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोहोचले होते. पोलिसांनी प्रवीण गायकवाड यांना विनंती केली की, आपण या संदर्भात फिर्याद द्या. मात्र ते फिर्याद द्यायला तयार नव्हते. तरी देखील पोलिसांनी फिर्याद घेतली आणि तत्काळ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आरोप अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत. जि घटना घडली आहे, त्यानुसार जी कलम लावावी लागतात, त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *