प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा मुख्य सूत्रधार शोधून कार्यवाही करा-सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन…
निलंगा प्रतिनिधी :- मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दि.१३ जुलै रोजी अक्कलकोट येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या दिपक काटे व सोबत असलेल्या समूहाने शाईफेक करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे.या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. मराठा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या व्यक्तींवर असा जीवघेणा हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी व या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवीण गायकवाड गेली तीस वर्षे झाले मराठा बहुजन समाजाचे प्रबोधन करून शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा ते महाराष्ट्र तसेच देशभर प्रचार प्रसार करत असतात, मराठा समाजातील जेष्ठ अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी आजपर्यंत हजारो व्यख्याने दिली आहेत तर शेकडो पुस्तके लिहून बहुजन समाजाचे प्रबोधन केले आहे. शिव शाहू फुले आंबेडकर यांचा सत्य इतिहास जगासमोर त्यांनी आजपर्यंत मांडला आहे याचाच राग मानत ठेऊन प्रतिगामी विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला असून हा हल्ला पुरोगामी विचारांना छेद देणारा आहे असे निवेदनात म्हणले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रभर शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. प्रवीण गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.निवेदनावर ईश्वर पाटील, हरिभाऊ सगरे, प्रमोद कदम, विनोद सोनवणे, प्रदीप कदम, विशाल जोळदापके,राजाभाऊ साळुंके,सतिष फट्टे,सचिन पवार, वैभव गोमसाळे, किरण पाटील, धीरज शिंदे, राहुल बिराजदार, डी एन बरमदे,भगवान जाधव, संजय इंगळे, माधव वाडीकर, संजीव आकडे,रितेश तांबोळे,सचिन नाईकवाडे, हनुमंत घारोळे,माधव गाडीवान,अपराजित मरगणे,अर्जुन जाधव,पृथ्वीराज जाधव आदींच्या स्वाक्षरी आहेत.
शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या पुरोगामी विचारांच्या समाज प्रबोधनकारांवर असे हल्ले होत असतील तर याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार आहेत अशी प्रतिक्रिया मराठा बहुजन समाजातील समाजबांधवांनी दिली आहे.
