“त्या” राडेबाज शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्याला बडतर्फ करा..
छावा व भीम आर्मी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी…
लातूर (प्रतिनिधी)- निलंगा पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांच्या मनमानी / तुघलकी/अनागोंदी कारभाराची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून त्यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी छावा संघटना व भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, निलंगा पंचायत समिती येथे कार्यरत असलेले गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड हे मागील तीन वर्षापासून येथेच कार्यरत आहेत. ते अत्यंत बेजवाबदार पणाचे वर्तन करतात त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या तुघलकी कार्यपद्धतीमुळे निलंगा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील मुले/मुली शिक्षण घेत असलेल्या अनेक गावातील जिल्हा परिषद शाळा डबघाईस आलेल्या आहेत. बहुतांश शाळांमधील गुणवत्ता ढासळलेली आहे. शिवाय ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे ते येथील काही मुठभर चांडाळ चौकडीला हाताशी धरून आजपर्यंत चुकीचे निर्णय घेत आलेले आहेत. त्यांच्या समंधातील काही शिक्षकांच्या सोयीसाठी प्रामाणिक कार्यक्षम शिक्षकांवर अन्याय करण्याचा त्यांनी धडाका चालू ठेवलेला आहे. त्यांच्या या चुकीच्या वर्तनाने निलंगा तालुक्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे.
पर्यायाने गरिबांची/सामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे अनेक पिढ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सर्व बाबीला सर्वस्वी निलंगा पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड हेच कारणीभूत व जवाबदारही आहेत. ते काही शाळांमधून बेसिस्त वर्तन करणाऱ्या शिक्षकांची पाठराखण करण्यास सुरेश गायकवाड हे माहिर आहेत.
याबाबतचे ज्वलंत उदाहरण सांगायचे म्हटले तर निलंगा तालुक्यातील
मौजे गुऱ्हाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वादग्रस्त व राडेबाज शिक्षक सपकाळे पांडुरंग तुकाराम हे मागील अनेक वर्षापासून कार्यरत असून हे शिक्षक शाळेत बेशिस्त वर्तन करून शालेय शिस्तीचा भंग करीत असल्याबाबत या शाळेच्या मुख्याध्यापकाने गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती निलंगा यांच्याकडे “त्या” शिक्षका बद्दल अनेकवेळा लेखी तक्रारी देऊन कळविलेले आहे.मात्र संबंधित गट शिक्षण अधिकारी हे त्या शिक्षकाची जाणीवपूर्वक पाठराखण करीत असून त्या शिक्षका विरोधात ठोस कारवाई न करता,वरिष्ठांकडे कारवाई बाबतचा अहवाल न पाठवता त्या शिक्षकाला पाठीशी घालून दाद मागणाऱ्या मुख्याध्यापका विरोधातच कारणे दाखवा नोटीस देऊन शासनाने त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करून स्वतःच्या स्वार्थासाठी चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा तुघलकी प्रकार चालविला आहे.
अश्या बेजबाबदार गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड यांची निःपक्षपातीपने,सखोल,उच्चस्तरीय ,स्वतंत्र यंत्रणे मार्फत पारदर्शकपणे चौकशी करून अश्या जिल्हा परिषद शाळा बंद पाडण्याचा कट रचणाऱ्या गटशिक्षण अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा छावा संघटनेच्या व भीम आर्मीच्या संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने दिनांक २१ जुलै २०२५ रोजी पासून लातूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर छावा संघटनेचे निलंगा तालुका अध्यक्ष तुलसीदास साळुंके व भीम आर्मी चे तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत…
