• Sat. Jul 12th, 2025

लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा: आमदार अमित विलासराव देशमुख

Byjantaadmin

Jul 9, 2025

लातूरच्या बसस्थानक व डेपो स्थलांतरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा:
आमदार अमित विलासराव देशमुख यांची परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक
यांच्याकडे मागणी

लातूर प्रतिनिधी) बुधवार ९ जुलै २५ :

लातूर शहर शिक्षण, कृषी आणि व्यापाराचे प्रमुख केंद्र बनले असून, शहरात
दररोज ८०० ते ९०० बसची ये-जा असते. प्रवाशांची वाढती संख्या पाहता
सध्याचे मध्यवर्ती बसस्थानक अपुरे पडत असून, त्याची दुरवस्था झाली आहे.
त्यामुळे लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक
येथे पार्किंग व्यवस्थेसह सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे, त्याचबरोबर
लातूर येथून महत्त्वाच्या शहरासाठी अद्यावत इलेक्ट्रिक बस सुरू कराव्यात
यासह विविध मागण्या राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक
यांच्याकडे त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीदरम्यान केल्या आहेत. त्यांनी
या सर्व मागण्यांना अनुकूलता दर्शवत संबंधितांना सूचना केल्या आहेत.

परिवहन विभागाच्या संदर्भाने लातूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांची
निवेदने परिवहन मंत्री ना. प्रतापजी सरनाईक यांच्याकडे वेळोवेळी देण्यात
आली आहेत, या सर्व निवेदनावर विचार करून निर्णय घेण्यासाठी त्यांनी आज
बुधवार दि. ९ जुलै २५ रोजी त्यांच्या दालनात संबंधित अधिकाऱ्यांच्या
बैठकीचे आयोजन केले होते.

परिवहन मंत्र्यांच्या दालनात आढावा बैठक:
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात राज्याचे माजी
वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील परिवहन विभागाच्या विविध
प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी
झालेल्या बैठकीत आमदार देशमुख यांनी बसस्थानकाचे बी.ओ.टी. तत्त्वावर
बहुमजली पार्किंग व्यवस्थेसह त्वरित नूतनीकरण करण्यात यावे, ज्याला
यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे असे सांगीतले. तर एस.टी. डेपो स्थलांतर
संदर्भात ते म्हणाले, लातूर शहराचा विस्तार झाल्याने छत्रपती शिवाजी
महाराज चौकानजीक असलेला एस.टी. डेपो आता शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आला
आहे, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील
एस.टी. डेपो अंबाजोगाई रोडवरील वर्कशॉप नजीक स्थलांतरित करावा आणि
त्याठिकाणी असलेले बसस्थानक क्र. २ छत्रपती शिवाजी महाराज चौकात
स्थलांतरित करावे

लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत जुनी झाली असून, तिच्या
दुरुस्तीसाठी ७८ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देऊन
निधी उपलब्ध करून देण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एस.टी.
डेपोतून बसचालकांना बसस्थानकाबाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा भाग असल्याने वाहन पार्किंगची मोठी अडचण
आहे. अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्र. २ मध्ये फक्त अंबाजोगाईकडे
जाणाऱ्या बस थांबतात, ज्यामुळे प्रवाशांना शहरात ये-जा करणे गैरसोयीचे
ठरते आणि या बसस्थानकातून प्रवाशांचा प्रतिसाद कमी मिळतो.

राज्यातील कंत्राटी एस.टी. चालक व कर्मचाऱ्यांना
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये समाविष्ट करून घेणेबाबत:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने खाजगी भाडेतत्त्वावर बस व चालक
कंत्राटी पद्धतीने घेण्याचे धोरण जाहीर केले आहे. या कंत्राटी बसला अपघात
झाल्यास किंवा बस नादुरुस्त झाल्यास त्याची जबाबदारी महामंडळ स्वीकारत
नाही, ज्यामुळे बसचालकांना विनाकारण प्रवाशांचा रोष पत्करावा लागतो.
कंत्राटी बसचालक व कंत्राटदार यांच्यात कोणताही करारनामा नसल्याने
चालकांना कोणतीच सुरक्षा नाही आणि त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून
वंचित राहावे लागत आहे. याकरीता चालक व त्यांचे परिवार आणि प्रवासी
नागरिक यांना संरक्षण मिळावे यासाठी कंत्राटदार व चालक यांच्यात समन्वय
साधण्यासाठी करारपत्र करावे आणि कंत्राटी एस.टी. चालकांच्या विविध
मागण्या मान्य करून त्यांना महामंडळात समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी
आमदार देशमुख यांनी केली

सर्व महानगरपालिका हद्दीत महिलांसाठी मोफत प्रवास योजना सुरू करावी
लातूर शहर महानगरपालिकेने महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास योजना सुरू
केली आहे, जी राज्यातील एकमेव अशी योजना आहे. राज्य शासनानेही महिलांसाठी
एस.टी. मध्ये ५० टक्के सवलतीच्या दरात प्रवास योजना सुरू केली आहे.
राज्याच्या परिवहन विभागाने नगरविकास विभागाला सूचित करून राज्यातील
सर्वच महानगरपालिका क्षेत्रात महिलांसाठी सवलतीच्या दरात म्हणजेच मोफत
प्रवास योजना सुरू करावी ही देखील मागणी परीवहन मंत्री प्रताप सरनाईन
यांच्याकडे केली.

अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक:
लातूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक महामार्गांवर शेतमालाची वाहतूक करणाऱ्या
शेतकऱ्यांच्या वाहनांची अडवणूक करून परिवहन अधिकारी पैशाची मागणी करतात,
अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशीही मागणी यावेळी करुन लातूर
जिल्ह्यात वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी २ हजार रुपये एका
वाहनाला द्यावे लागतात. पैसे दिले नाहीत तर परिवहन अधिकारी त्रुटी
काढतात, हा एक प्रकारे लाच घेण्याचा प्रकार आहे. अशा अधिकाऱ्यांवर देखील
कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी सर्व मागण्यावर
सवीस्तर चर्चा होवून या सर्व प्रश्नांची तातडीने सोडवणूक केली जाईल, अशी

ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *