निलंगा ते उदगीर मार्गावर मंजूर बस फेऱ्यासोबत शिवशाही बसच्या जादा फेऱ्या
लातूर, दि. 9 (जिमाका) : निलंगा ते उदगीर या मार्गावर निलंगा आगाराच्या 8 बसेस मंजूर असून संपूर्ण नियमितपणे सुरू आहेत. या बसेसच्या दर अर्धा तासाला एक याप्रमाणे जाणाऱ्या 24 व येणाऱ्या 24 अशा फेऱ्या चालतात. तसेच त्या व्यतिरिक्त या मागार्वार उदगीर-निलंगा-सोलापूर, उदगीर-शहाजनी औराद 2 फेऱ्या, देगलूर-पंढरपूर असे दैनंदिन बसेस चालतात. या व्यतिरिक्त प्रवाशी गर्दी पाहून उदगीर ते निलंगा मार्गावर उदगीर आगारामार्फत शिवशाही बसचे 4 ज्यादा बसेस चालू करण्यात आल्या आहेत. या बसेस स्वच्छ व तांत्रिक दोष नसलेल्या आहेत.
शिवशाही बसेसच्या एकूण 24 फेऱ्या चालत असून त्याचे दैनंदिन किलोमीटर 1 हजार 589 इतके आहेत. शिवशाही बसेसमध्येही ज्येष्ठ नागरिक यांना 50 टक्के, अमृत ज्येष्ठ नागरिक यांना 100 टक्के व महिला सन्मान योजनेतंर्गत महिलांना 50 टक्के सवलत लागू आहे. या मार्गावर धावणाऱ्या शिवशाही जादा बसेस स्वच्छ व तांत्रिक दोष नसल्याबाबतची पडताळणी करुनच मार्गावर पाठविण्यात येत आहेत, असे राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.
