• Fri. May 2nd, 2025

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याची आ. निलंगेकरांकडून पाहणी

Byjantaadmin

Dec 19, 2022

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साखर कारखान्याची आ. निलंगेकरांकडून पाहणी

कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याची सुचना
निलंगा/प्रतिनिधी ः- निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथे असलेला डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यासाठी ओंकार शुगर्स प्रा.लि. ने घेतलेला आहे. त्यांच्या वतीने यावर्षी गाळप हंगाम सुरु करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कारखाना स्थळी भेट देऊन गाळप हंगामाची पाहणी केली. त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याची सुचना चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांना आ. निलंगेकर यांनी दिली. यावेळी लवकरच कारखाना अधिक गतीने गाळप करेल असा विश्वास देऊन शेतकर्‍यांना योग्य तो भाव दिला जाईल अशी ग्वाही यावेळी चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली.
निलंगा तालुक्यासह विधानसभा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी अतिशय महत्वाचा असलेला अंबुलगा येथील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. यासाठी माजी मंत्री आ. निलंगेकर यांनी विशेष लक्ष देऊन आणि याबाबत पाठपुरावा करून कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया पुर्ण केली. हा कारखाना आता ओंकार शुगर्स प्रा.लि. ने भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतलेला असून यावर्षीचा गळीत हंगामही कारखाना प्रशासनाने सुरु केला आहे. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी गळीत हंगाम सुरु झाल्यानंतर कारखानास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारखान्यात नव्याने बसविण्यात आलेल्या कांही यंत्रसामुग्रीचे पुजन आ. निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना हा शेतकर्‍यांच्या मालकीचा असून शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी आणि त्यांच्या जीवनात क्रांती घडविण्यासाठी कारखाना प्रशासन अधिक तत्परतेने व गतीने काम करत असल्याबद्दल आ. निलंगेकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर कारखाना प्रशासनाने ज्या शेतकर्‍यांनी गाळपासाठी ऊसाची नोंद केली आहे त्यांच्या ऊसाला प्राधान्य देऊन त्यांचा ऊस वेळेत गाळप करण्यासाठी घेऊन जावा अशी सुचना देऊन कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना बांधील असल्याने कारखाना प्रशासनाने त्या दृष्टीकोनातून गाळप अधिक गतीने आणि पुर्ण कार्यक्षमतेने करावे अशी सुचना कारखाना प्रशासनास दिली. कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकर्‍यांनी कारखाना प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन करून कारखाना प्रशासन शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य भाव देण्यासाठी बांधील असेल असेही स्पष्ट केले.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी कारखान्याच्या विविध विभागाची माहिती देऊन यंत्रसामुग्रीबाबतही आ. निलंगेकर यांना अवगत केले. कारखाना प्रशासनाने अतिशय कमी वेळेत गाळप हंगाम सुरु केल्याचे सांगून यावर्षी जास्तीत जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे चेअरमन बोत्रे यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केल्याशिवाय हंगाम बंद होणार नाही असा विश्वास देऊन शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य भाव देण्यात येईल अशी ग्वाही चेअरमन बोत्रे यांनी यावेळी दिली. आगामी काळात कारखाना सहप्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असणार्‍या बदल घडवत असून पुढील वर्षी कांही सहप्रकल्प सुरु करण्यात येतील अशी माहिती चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी यावेळी दिली.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासोबत यावेळी जि.प.च्या माजी उपाध्यक्षा सौ. भारतबाई साळूंके, माजी समाजकल्याण सभापती तथा जिल्हा भाजपाचे संघटन सरचिटणीस संजय दोरवे, खादी ग्रामद्योगचे दगडू साळूंके यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आ. निलंगेकरांनी कारखाना प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपले सहकार्य आवश्यक असल्याचे सांगून आपण जलदगतीने काम केल्यामुळेच कारखाना यावर्षी गळीत हंगाम सुरु करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *