लातूरमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर — अभाविपचा खारीचा वाटा
लातूर, 15 एप्रिल 2025: आज मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारच्या या घोषणेमुळे लातूरच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळणार असून, विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेने जल्लोषात स्वागत केले. फटाके फोडून व विद्यार्थ्यांना साखर वाटून अभाविपने आपला आनंद व्यक्त केला तसेच सरकारचे आभार मानले.
अभाविपने लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता. २०२१ मध्ये तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदन सादर करून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर वेळोवेळी सरकारकडे निवेदन देत मागणी लावून धरली होती.
अभाविपने यावेळी सरकारकडे आणखी एक महत्त्वाची मागणी मांडली आहे. “लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे, त्यामुळे इथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे. जसे सरकारने अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी निर्णय घेतला, तसाच लातूरसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासही मान्यता द्यावी,” अशी अपेक्षा अभाविपतर्फे व्यक्त करण्यात आली.
यावेळी महानगर मंत्री तेजूमाई राऊत, जिल्हा संयोजक यश अरिकर, पवन एरंडे, ओमप्रसाद जाधव, भागवत बिरादार व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने लातूर येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर येथे सुरू करण्यात जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे परभणी, बीड , लातूर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेणे सोयीचे होईल. विद्यार्थी परिषदेने वारंवार महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केला होता १३ ऑगस्ट २०२१ रोजी तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना अभाविपच्या शिष्टमंडळाने भेटून मागणी केली होती. अभाविपच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले आहे अशी भावना देवगिरी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे यांनी व्यक्त केली व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करून निर्णयाचे स्वागत केले आहे.