घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी याप्रमाणे
आम्ही नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतो
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर तहसीलच्या पुढाकारातून नागरीकांना कबाले वाटप
आणि शेतकरी कुटुंबांना सहाय्य
लातूर प्रतिनिधी: दि. १६ एप्रिल २०२५ (बुधवार)
महाराष्ट्र शासनाच्या साहाय्याने लातूर तहसीलने आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सानुग्रह अनुदान देऊन माता-भगिनींना आर्थिक बळ
दिले आहे. शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये यासाठी लातूर तालुक्यात
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्यासाठी मोहीम राबविण्यात यावी.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी नेहमी या दिशेने प्रयत्नांचे आवाहन केले
होते. घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी—त्याप्रमाणे आम्ही
नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करत आहोत,” असे सांगून प्रशासन
नागरिकाच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण
सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
बुधवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी लातूर तहसील कार्यालय येथे लातूर
तालुक्यातील खोपेगाव आणि चांडेश्वर येथील नागरिकांना कबाले वाटप करण्यात
आले. तसेच शासनाच्या विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांना प्रातिनिधिक
स्वरूपात अनुदानही वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी लातूरचे उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे विरोळे, तहसीलदार सौदागर
तांदळे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुकाराम भालके, नायब
तहसीलदार सुधीर देशमुख, नायब तहसीलदार गणेश सरवदे, तालुका कृषी अधिकारी
दिलीप राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी, चांडेश्वर आणि
खोपेगाव येथील काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, सरपंच, ग्रामसेवक,
तलाठी, मंडळ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते खोपेगाव येथील
शंकर चंदर मोरे, जयवंत सूर्यभान पवार, कोंडीबा गंगाराम वाघमारे, दिगंबर
गंगाराम वाघमारे आणि चांडेश्वर येथील अजयकुमार सपाटे, बालाजी नलावडे,
चंद्रकांत नलावडे यांना प्रातिनिधिक स्वरूपात कबाले वाटप करण्यात आले.
तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेचा वीस हजार रुपयांचा
अर्थसहाय्याचा धनादेश सारिखा संजय मुळे यांना देण्यात आला. गंगापूर येथील
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय कोमलबाई शिवाजी धोत्रे यांना एक
लाख रुपयांच्या शासकीय अनुदानाचा धनादेश वाटप करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले, “लातूर
तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवस
कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.
कबाल्याचा प्रश्न आता मार्गी लागत आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब
ग्रामस्थांना त्यांच्या जागेचे मालकीपत्र लातूर तहसील कार्यालयाने दिले
आहे. यापूर्वीही कबाले वाटप करण्यात आले आहे. कबाल्यावर अतिक्रमण झाले
असेल तर ते दूर केले जाईल.” लातूर तहसील कार्यालय इमारतीच्या
विस्तारासाठी चार कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी
पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “लातूर तहसील कार्यालय हे महाराष्ट्रात
नावाजलेले तहसील कार्यालय आहे. लोकनेते विलासराव देशमुख हे तत्कालीन
मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर तहसील कार्यालयाच्या आराखड्याला
परवानगी दिली. माता-भगिनींना शासनाच्या अर्थसहाय्यातून जीवन जगण्यासाठी
बळ मिळेल. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना लातूर तहसीलकडून
सानुग्रह अनुदान देण्यात आले. लातूर तहसीलनेही लातूर तालुक्यात एक मोहीम
राबवून शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणाव्यात, असे लोकनेते विलासराव
देशमुख नेहमी म्हणायचे. घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी,
त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहोत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही
सदैव कटिबद्ध आहोत.”
चौकट:
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर तहसील कार्यालय येथे
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लातूर तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा घेतला.
पाणीटंचाईबाबत अधिग्रहणाचा कोणी अर्ज केला तर त्याला तात्काळ परवानगी
देण्यात यावी, जनावरांचा चारा मुबलक उपलब्ध करून ठेवावा,
ग्रामपंचायतीकडून पाणीटंचाईचा आढावा घेऊन लातूर तालुक्याचा पाणीटंचाई
कृती आराखडा तयार करावा, अशा विविध सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना
केल्या.
