शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारवर 420 चा गुन्हा दाखल करा
क्रांतिकारी शेतकरी संघटनेची लातूर पोलीस अधीक्षका कडे मागणी
लातूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु आणि सोयाबीनला 6000 रू भाव देऊ म्हणून शेतकऱ्यांची घोर फसवणूक केल्याने केंद्र आणि राज्य सरकार वर 420 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लातूर येथे पोलीस अधीक्षक यांच्या कडे केली आहे.
आज शेतकऱ्यांनी सरकार विरोधात लातुरात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली रखरखत्या उन्हात आंदोलन केले.महाराष्ट्र विधानसभा निवडणुक जाहीरनाम्यातून शेतकरी कर्जमुक्ती आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल 6000 रू भाव देऊ अशा खोट्या अश्वासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यात प्रचंड आक्रोश आणि असंतोष आहे.
जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं आता देणं घेणं फिटलं म्हणत शेतकरी नेते सत्तार पटेल यांनी सरकार वर असूड ओढत जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत संपूर्ण राज्यात रस्त्यावर आंदोलन करीत राहू असा इशारा दिला आहे
शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या
अनुषंगाने क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून शेतकऱ्यांचा संघर्ष योद्धा मा रविकांत तुपकर साहेब यांच्या समर्थ नेतृत्वा खाली संघटनेचे कोअर कमिटी सदस्य सत्तार पटेल, राजेंद्र मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी आपल्या न्याय्य मागण्यासाठी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात दिनांक 19 मार्च 2025 रोजी कर्जाचे सातबारे आणि कापूस सोयाबीन अरबी समुद्रात बुडवून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सत्याग्रही आंदोलन केले होते.तरी सुद्धा संवेदना नसलेल्या सरकारला शेतकऱ्यांविषयी काही हीं देणे घेणं उरलं नाही, राईट ऑफ च्या नावाखाली उदयोगपतीचे करोडोचे कर्ज माफ केले जाते मात्र जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्याला वचन देऊन सुद्धा त्याला कर्जमुक्त केले जात नाही, भांडवलदारधार्जीने सरकार असल्याने गरिबी श्रीमंती दरी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 जाहीरनाम्यातून प्रचारादरम्यान पंतप्रधान श्री नरेंद्जी मोदी यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनला
प्रतीक्विंटल 6000 रू भाव देऊ असे आश्वासन दिले होते मात्र आमचे सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने विकले गेले त्यामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल करुन फसवणूक केली. सरकारचे चुकीचे धोरण पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मरण ठरले. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करु अशास्वरूपाचा महायुतीचा जाहीरनामा जाहीर करुन शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा असा जयघोष केला परंतु सत्तेवर येताच त्यांचे अर्थमंत्री अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात कर्ज भरा भरा भरा. एवढ्यावर न थांबता त्यांचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना स्वतः ची लाज लज्जा जणू वेशीवरच टांगली की काय असं बेताल वक्तव्य केलं.
एकंदरीत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूक जाहीरनामा आणि प्रचारात शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देणं, त्यांची दिशाभूल करणे, राजकीय फायदा उचलणे असे गंभीर बाबी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री या दोन्ही मान्यवरांनी केल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली म्हणून त्याच्यावर फसवणूकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही राष्ट्रपिता महात्मा गांधी, शेतकऱ्यच्या असंतोषाचे जनक महात्मा फुले, घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत त्यांच्या विचाराला वंदन करून सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी पोलीस अधीक्षक यांच्या कडे शेतकरी आंदोलकानी निवेदन दिले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी आणि शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी सरकार राज्यातील प्रमुख मुद्दे भटकावत असून नको असलेले काळबाह्य औरंगजेब कबर खोदून जनतेची दिशाभूल करीत आहे परंतु आज आम्ही जाती साठी नाही तर मातीसाठी लढू व संपूर्ण राज्यातील गावगाड्यात विखूरलेल्या शेतकरी शेतमजूराला एकत्र करुन पाशवी बहूमताच्या जोमात सत्ताधारी तर विरोधी पक्ष कोमात असल्याने लोकमत शोधत आम्ही निकराची लढाई करु असा इशारा श्री मोरे दिला.
यावेळी अरुण दादा कुलकर्णी जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना लातूर, प्रज्योत हुडे
जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना युवा आघाडी लातूर, अमर हैबतपुरे, निलेश बिरादार, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, बिभीषण कदम, अनंत कांबळे, अंकुश गायकवाड, हिराचंद जैन, दत्ता किणीकर, शेषराव जाधव, जीवन कसबे, सुभाष कसबे, अंकिता गायकवाड, सावन गवळी, राहुल गायकवाड, मधुकर गव्हाणे,रजनीकांत पाटोळे, योगेश गायकवाड, मुस्तफा देशमुख यांच्यासह महिला पुरुष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती.
