दयानंद विधी महाविद्यालयात न्यायमूर्ती श्री. प्रसन्ना भालचंद्र वराळे यांच्या सन्मानार्थ गौरव सोहळा.
दयानंद शिक्षण संस्थाद्वारा संचालित दयानंद विधी महाविद्यालय,
लातूर; लातूर जिल्हा वकिल मंडळ आणि दयानंद विधी महाविद्यालय माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वा. दयानंद सभागृह, लातूर येथे सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायमूर्ती श्री. प्रसन्ना भालचंद्र वराळे यांच्या सन्मानार्थ गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री. प्रसन्ना वराळे हे दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून १९८५ ला कायद्याची पदवी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालय तथा कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीमुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी २०२५ ला त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली. त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या न्यायक्षेत्रातील उल्लेखनीय व यशस्वी वाटचालीचा आणि कार्याचा गौरव करण्यासाठी प्रस्तुत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी अनेक नामवंत विधीज्ञ, न्यायाधीश, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, सन्माननीय पत्रकार आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विधी क्षेत्रातील सर्व अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन दयानंद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, दयानंद विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या, दयानंद माजी विद्यार्थी संघ व लातूर जिल्हा वकिल मंडळ यांनी केले आहे.
