डिप्लोमा इन फार्मसी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: PCI कडून तात्पुरत्या नोंदणीस मान्यता
निलंगा-फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (PCI) ने डिप्लोमा इन फार्मसी एक्झिट परीक्षा नियमावली 2022 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एक्झिट परीक्षेतील पेपरांची संख्या तीनवरून एक करण्याचा प्रस्ताव अद्याप सरकारकडून मंजूर झालेला नसल्यामुळे, PCI ने 2022-23 शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या व 2023-24 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरती नोंदणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्व राज्य फार्मसी कौन्सिल व राज्य सरकारांना या विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थी फार्मासिस्ट म्हणून काम करू शकतील, मात्र एक्झिट परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय नोंदणी नूतनीकरण करता येणार नाही.विद्यार्थ्यांनी PCI द्वारे दिलेल्या नमुन्यातील प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हिट) भरून राज्य फार्मसी कौन्सिलच्या निबंधकांकडे सादर करणे आवश्यक आहे.हा निर्णय विद्यार्थ्यांना बेरोजगारीपासून वाचवण्यासाठी तसेच नियमानुसार पारदर्शकता राखण्यासाठी घेण्यात आला आहे.अधिक माहितीसाठी PCI च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी अशी माहिती डॉ भागवत पौळ प्राचार्य महाराष्ट्र पॉली डी फार्मसी इन्स्टिट्यूट निलगा यांनी दिली आहे