• Tue. Apr 29th, 2025

एका पोलिसानं साडी नेसून करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं; धसांचा पुन्हा खळबळजनक दावा

Byjantaadmin

Jan 3, 2025

बीड: केज तालुक्यातील मस्सागावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय सातत्यानं लावून धरणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहीत आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी पत्रकार परिषदेत केला.

करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्याआधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तुल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत धस यांनी खळबळजनक दावा केला आहे.’करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी तिसरी व्यक्ती नव्हती. ती बीड पोलीस दलातील एक व्यक्ती होती. साडी नेसून त्यानं करुणा मुंडेंच्या कारमध्ये पिस्तुल ठेवलं. त्याचं नावसुद्धा मला माहीत आहे. पण ते तुम्हाला सांगणार नाही. त्याचं नाव मी पोलीस अधीक्षकांना सांगेन,’ अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.पोलीस दलातील काही जणांच्या बदल्या वाल्मिक कराडनं केल्या आहेत. यातील काही अधिकारीच आता त्याची चौकशी करत असल्याचा दावा धस यांनी केला. ‘तपास पथकातील एकाला बदली करुन कराड यांनी गडचिरोलीवरुन आणलेलं आहे. त्या अधिकाऱ्यानं त्याची स्वामीनिष्ठा दाखवू नये. काही अधिकारी त्यांच्या अतिसंपर्कात आहेत ही बाबदेखील समोर आलेली आहे,’ असं धस म्हणाले.

‘तपास पथकातील तेली साहेबांसह अन्य काही अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप नाही. त्यांच्या सोबत असलेल्या आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दलही माझी तक्रार नाही. पण क्लास ३ अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्याबद्दलची माहिती दिलेली नाही. त्यांनी मला त्या अधिकाऱ्यांबद्दल अधिकचे तपशील देण्यास सांगितलं आहेत. त्यांचे तपशील मी मुख्यमंत्र्यांना देईन,’ असं धस यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed