कापडी पिशव्यांचे वाटप, लातूर प्लास्टिक मुक्तीसाठी नागरिकांचा पुढाकार
संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनी प्लास्टिक मुक्त लातूर अभियानास प्रारंभ
लातूर
नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी व लातूर शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी प्लास्टिकला पूर्णपणे मूठमाती देत शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी पुढाकार घेतला असून, प्लास्टिक मुक्त लातूर अभियानाची सुरुवात माणूस प्रतिष्ठान संचलित माझं घर प्रकल्पातून नागरिकांना प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप करून करण्यात आली.

संत गाडगेबाबा व ज्येष्ठ समाजवादी नेते ॲड मनोहरराव गोमारे यांना स्मृती दिनानिमित्त शुक्रवारी माझं घर या प्रकल्पात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्रा. सुभाष भिंगे, डॉ. गणेश पनाळे, रामराजे आत्राम, दगडू साहेब पडिले, अनिल शहा, मकबूल वलांडीकर, हरीभाऊ गायकवाड, माझं घरचे प्रमुख शरद झरे, विनोद चव्हाण राहुल लोंढे, राहुल गोरे, डी उमाकांत प्रा. माडे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले.
समाजामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्याप्रमाणात वाढला असून यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. पर्यावरणाचे संवर्धन करायचे असेल तर प्लास्टिकच्या पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा वापर प्रभावी ठरू शकतो. महिलांकडून विनावापराच्या साड्या तसेच शाली चें संकलित करून त्यापासून पिशव्या तयार करून त्या नागरीकांना मोफत वाटप करून प्लास्टिक बंदी व पर्यावरण संवर्धन या संदर्भात जनजागृती करण्यासाठी प्लास्टिक मुक्त लातूर या अभियानाची सुरूवात सजग नागरीकांनी एकत्र येत संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त केली आहे.
शुक्रवारी या अभियानाची सुरुवात म्हणून साड्यांपासून तयार केलेल्या पिशव्यांचे शंभर नागरीकांना वाटप करण्यात आले. घरा-घरात वापराविना पडून राहिलेल्या साड्यांची संख्या अधिक असते. या साड्यांपासून पिशव्या तयार करता येऊ शकतात, म्हणुन नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.