पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे
मा. आमदार धिरज विलासराव देशमुख यांची मागणी; केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे दिले निवेदन
लातूर/प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मधील रेणापूर तालुक्यातील पानगाव येथे भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी मा. आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी केंद्र सरकारकडे केली. याबाबतचे निवेदन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह आणि ‘भारतीय कापूस निगम’च्या महाप्रबंधकांना देण्यात आले.
पानगाव येथे चांगल्या प्रतीच्या व लांब धाग्याच्या कापसाची लागवड होत आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून या कापसाला चांगला दर मिळावा, यासाठी मा. आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. धिरज विलासराव देशमुख हे प्रयत्नशील आहेत. ‘भारतीय कापूस निगम’च्या महाप्रबंधकांना पत्र देवून कापूस खरेदी केंद्र पानगाव येथे सुरू करण्याची मागणी केली आहे.पानगाव येथे व्यंकटेश कॉटन इंडस्ट्रीज लि. येथे सर्व सुविधा उपलब्ध असून परिसरात चांगल्या प्रतिचा व लांब धाग्याचा कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड असल्याने सीसीआय खरेदी केंद्राच्या यादीत पानगावचा समावेश करून सन 2024-25 वर्षाकरिता सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू झाले तर परिसरातील शेतक-यांना सोईचे होईल. त्यामुळे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी मा. आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री धिरज विलासराव देशमुख यांनी पत्राद्वारे केली.
याच विषयाबाबत दिल्ली येथे लातूरचे खासदार श्री डॉ शिवाजी काळगे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली. यावेळी खासदार श्री. रविंद्र चव्हाण, खासदार श्री. कल्याण काळे, श्री. बळवंत वानखेडे उपस्थित होते. पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले तर या भागातील शेतकरी बांधवांना ते अधिक सोईचे ठरेल असा मला विश्वास वाटतो. ते मंजूर करून घेण्यासाठी विविध माध्यमातून आम्ही सतत पाठपुरावा करत राहू, असे मा. आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री धिरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
