नागपूर:-विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंचा संवेदना संपल्या असून ईडी सरकारमध्ये असलेला विसंवाद रोज दिसतो असा टोलाही अजित पवारांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, राज्यातील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. मात्र इतर गोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. त्यामुळे यातून राज्याच्या मुख्यमंत्र्याची संवेदना संपल्याचे स्पष्ट दिसत आहे, असा टोला अजित पवार यांनी लगावला. सत्ताधारी ईडी सरकारमधील विसंवाद दररोज पहायला मिळत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. जनतेच्या मनातील सरकारबद्दलचा विश्वास संपुष्टात आला आहे, असे पवार म्हणाले.
विधिमंडळाचे उद्या सोमवार 19 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याचे संकेत विरोधकांनी दिले आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंधेला सरकारच्या चहा पानावर बहिष्कार घालत विरोधकांनी सडकून टीका केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांसह राज्यपाल कोश्यारींपासून चंद्रकांत पाटील यांच्यापर्यत भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्ये, राज्यातील उद्याेगांची पळवापळवी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ते प्रसाद लाड, आंतरधर्मीय विवाह समन्वय समिती, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी मवाळ धोरण स्वीकारणारे सरकार निषेध म्हणून चहापानावर बहिष्कार घालीत असल्याचे सांगत अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला

राज्य सरकारचे अपयश
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत भाजप-शिवसेनेच्या ईडी सरकारच्या अपयाशवर बोट ठेवले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दरही दिला जात नाही, त्यांच्या खात्यात दिलेल्या मदतीचे पैसे जमा झालेले नाही, असेही दानवे म्हणाले. राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचे आरोप झाले. पण या मंत्र्यांमध्ये नैतिकता उरली आहे की नाही, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला. महापुरूषांचा अपमान सहक केला जाणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय विरोधक स्वस्थ बसणार नाही. या वक्तव्यांमागील मास्टर माईंड शोधला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांनी केली.