लातुर जिल्ह्यातील दोन माजी पालकमंत्री चक्क एकमेकांचा हात घट्ट धरतात तेंव्हा…
लातुर: लातूर जिल्ह्याच्या राजकारणात विरुद्ध दिशेची दोन टोकं म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते काॅंग्रेसचे नेते अमित देशमुख आणि भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे चक्क एकमेकांचा हात घट्ट धरून उभे असतांना दिसले. निमित्त होते एका विवाह सोहळ्याचे. लातूरमधील एका हाॅटेलात पार पडलेल्या विवाह सोहळ्याला योगायोगाने अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर एकाच वेळी आले.
स्टेजवर वधू-वराला शुभेच्छा देण्यासाठी देखील ते एकाचवेळी पोहचले आणि मग सामुहिक फोटोसाठी शेजारी शेजारीच उभे राहिले. फोटोसाठी पोज देतांना दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट धरला होता. अमित देशमुख यांनी हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या फोटोची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
लातूर जिल्ह्यातील काॅंग्रेसच्या अस्तित्वाला धक्का देण्याचे काम खऱ्या अर्थाने भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिल्याचे बोलले जाते. राज्यात भाजपचे सरकार असतांना मिळालेल्या मंत्रीपदाचा लाभ निलंगेकर यांनी जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी केल्याचे दिसून आले. त्यामुळे कधी स्वप्नातही महापालिका, जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येईल असे वाटले नव्हते त्या दोन्ही ठिकाणी भाजपने झिरो टू हिरो अशी कामगिरी बजावली होती.
पुढे घडलेल्या नाट्यमय घडामोडीत लातूर महापालिकेतील सत्ता भाजपला गमवावी लागली होती. परंतु देशमुखांच्या गढीला हादरे देण्याचे काम मागच्या काही काळात भाजपकडून झाले हे नाकारता येणार नाही. त्यामुळे जिल्ह्यात देशमुख विरुद्ध निलंगेकर असा संघर्ष पहायला मिळाला. मग तो खाजगी साखर कारखाना देशमुखांच्या कंपनीने ताब्यात घेतला तेव्हाही दिसला, लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्तानेही दिसला. तर आघाडी सरकार असतांना अमित देशमुख यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा तो अधिक प्रकर्षाने जाणवला.त्यामुळे अमित देशमुख, संभाजी पाटील हे सहसा कधी एकत्र आलेले दिसले नाही. एकमेकांवर राजकी आरोप-प्रत्यारोप करतांना मात्र ते अनेकदा दिसले. आता लातूरातील एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने अनावधानाने का होईना पण हे दोन नेते एकत्र दिसले. विशेष म्हणजे दोघांनीही राजकीय वैर विसरून एकमेकांकडे पाहत स्मित हास्य केले.
स्टेजवर एकत्र शुभेच्छा देण्यासाठी गेले आणि फोटो देतांना देखील दोघांनी एकमेकांचे हात घट्ट पकडून आपल्यात जणू वैरच नाही, असे भाव चेहऱ्यावर दाखवले. राजकारणात वैयक्तिक संबंध वेगळे आणि राजकीय वेगळे असेच नेहमीच सांगितले जाते. या निमित्ताने त्यांची प्रचिती देखील आली. अमित देशमुख-संभाजी पाटील निलंगेकर यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.