विधानसभा निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक सुरू !
निवडणूक निरीक्षकांचा उमेदवार, राजकीय पक्ष प्रतिनिधींशी संवाद
• सर्व उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे
• मतदान प्रक्रियेबाबत शंका, तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
लातूर, दि. ७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येत आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून मतदान प्रकिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जात असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या सामान्य निवडणूक निरीक्षकांनी आज जिल्ह्यातील उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी, लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान, साकेत मालवीया यांनी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीबाबत माहिती दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांच्यासह जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक यंत्रणा कार्यवाही करीत आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत विविध उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील सर्व मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे वेब कास्टिंग करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ. करुणा कुमारी यांनी सांगितले.
सर्व उमेदवारांना संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामार्फत अंतिम मतदार यादी, मतदान केंद्रांची यादी दिली जाणार आहे. तसेच कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाणार आहे, याची यादीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व उमेदवारांनी आपल्या मतदान प्रतिनिधींना माहिती देवून आवश्यक कार्यवाही करण्यास सांगावे. तसेच गृह मतदान प्रसंगीही आपले मतदान प्रतिनिधी उपस्थित राहतील, याची दक्षता घ्यावी, असे सामान्य निवडणूक निरीक्षक साकेत मालवीया यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रीयेबाबत कोणतीही तक्रार अथवा माहिती द्यावयाची असल्यास लातूर शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११ ते दुपारी १२ या कालावधीत निवडणूक निरीक्षक यांच्याकडे देता येईल. तसेच दूरध्वनी क्रमांकाद्वारेही माहिती देता येईल, असे त्यांनी सागितले.
लातूर जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कटिबध्द आहे. तसेच मतदानादिवशी मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सर्व उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करून जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. तसेच उमेदवार, राजकीय पक्ष प्रतिनिधी यांनी आपापल्या मतदान प्रतिनिधी यांना मतदान केंद्र, मतदार यादीबाबत अवगत करावे, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध महत्वाच्या टप्प्यांची माहिती दिली. तसेच या टप्प्यावर उमेदवारांनी आपले प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याचे आवाहन केले.
***
