• Wed. Apr 30th, 2025

मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून 12 कागदपत्रे ग्राह्य धरणार

Byjantaadmin

Nov 7, 2024

मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून 12 कागदपत्रे ग्राह्य धरणार

लातूर, दि. 06 : भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्राशिवाय आणखी 12 कागदपत्रे ग्राह्य धरण्याच्या सूचना भारत निवडणूक आयोगाच्या 21 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्रानुसार प्राप्त झाल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम यांनी कळविले आहे.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (ईपिक कार्ड) मिळालेले मतदार मतदानादिवशी हे मतदान केंद्रावर आपले हे मतदार ओळखपत्र ओळखीचा पुरावा म्हणून सादर करतील. याशिवाय ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही, अशा मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य धरलेल्या 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागेल. ही कागदपत्रे मतदान केंद्रावर दाखवल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील. मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठ्ठी ग्राह्य असणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे डॉ. कदम यांनी सांगितले.

मतदान ओळखपत्राला पर्यायी 12 कागदपत्रे

आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक अथवा पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र अथवा राज्य सरकार किंवा सार्वजनिक उपक्रम अथवा पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना अथवा आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed