महात्मा बसवेश्वरांचा विचार काँग्रेसने जोपासला, अमित देशमुख यांचे प्रतिपादन
खासदार डॉ. शिवाजी काळगे व समस्त लिंगायत समाज आयोजित

ऋणनिर्देश व दीपावली स्नेह मिलन सोहळा
लातूर/ प्रतिनिधी –
सर्वधर्मसमभावाचा विचार, जात विरहित समाज हा महात्मा बसवेश्वरांनी दिलेला मंत्र आहे. काँग्रेसने
सुद्धा सर्वधर्मसमभाव हाच विचार सुरुवातीपासून जोपासला. गेल्या पन्नास वर्षांमध्ये काँग्रेसने या
जिल्ह्यात-शहरात याच विचारांवर राजकारण केले. आदरणीय केशवराव सोनवणे यांच्यापासून
शिवराज पाटील चाकूरकर, लोकनेते विलासराव देशमुख, दिलीपराव देशमुख, डॉ. शिवाजी काळगे,
माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे आणि आम्ही सर्वांनी सामान्य माणसाच्या
केसाला धक्का लागू न देता त्यांना जपण्याचे काम केले, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे व समस्त लिंगायत समाज लातूर
आयोजित ऋणनिर्देश व दीपावली स्नेह मिलन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
माजी मंत्री सरकार महर्षी दिलीपराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी काळगे, राष्ट्रवादी काँग्रेस
शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी महापौर स्मिता खानापूरे, बंडाप्पा काळगे, डॉ.
अरविंद भातंबरे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकला नाही. पण अलीकडे रोज दिल्ली पुढे मुजरा करतो आहे. या
निवडणुकीमध्ये अनेक पक्ष उभे राहिले आहेत. पण आपल्याला महाविकास आघाडीला निवडून
आणायचे आहे, काँग्रेस पक्षाला निवडून आणायचे आहे. तुमचे आशीर्वाद येत्या २० नोव्हेंबर रोजी
महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे करावेत. लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर, अहमदपूर, औसा,
निलंगा या लातूर जिल्ह्यातील सहाच्या सहा जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून
आणावे, असे आवाहन आमदार अमित देशमुख यांनी यावेळी केले.
व्यक्ती नव्हे तर विचार म्हणून काँग्रेसच्या पाठीशी राहा-दिलीपराव देशमुख
सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी देशाच्या आणि राज्याच्या जडणघडणीतील
काँग्रेसच्या योगदानाविषयी भाष्य केले. ते म्हणाले, व्यक्ती म्हणून नाही तर विचार म्हणून काँग्रेसच्यापाठीशी उभे रहा. “करो सोने के सौ टुकड़े की कीमत कम नही होती, मुसीबतो मे शरीफोंकी शराफत
कम नही होती” या भूमिकेतून आपल्याला पुढे जायचे असल्याचे त्यांनी म्हटले.
या राज्याला, या देशाला परत वैभवाचे दिवस आणायचे असेल तर एका विशिष्ट समाजासाठी नव्हे
सर्वांसाठी आपल्याला काम करायचे आहे. महात्मा गांधीजींनी, नेहरूजींनी, इंदिराजींनी सुरू केलेला
काँग्रेसचा विचार आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याला यश आणायचे आहे.
शेवटच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही. तोपर्यंत आपल्याला काम करायचे आहे, असेही
त्यांनी यावेळी म्हटले. खासदार डॉ. शिवाजी काळगे असे म्हणाले, समाजामध्ये विनाकारण तेढ निर्माण करण्याचे काम काही
मंडळी करत असतात. अशा गोष्टींना थारा न देणे हे सुधारीत समाजाचे लक्षण आहे. आदरणीय
विलासरावजी देशमुख साहेबांच्या काळात महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी केली जाऊ लागली.
कपिलधारेच्या ठिकाणी शासकीय पूजा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळात सुरु झाली.
सर्वजण एकत्र येऊया- डॉ. शिवाजी काळगे
चुकीच्या गोष्टी समाजामध्ये निर्माण करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपण बाजूला केले पाहिजे व सर्वांनी
मिळून एकत्रित येऊन आपण अमित विलासराव देशमुख यांना येत्या २० तारखेला बहुमताने निवडून
आणून विजयी करूया व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, या असे आवाहन खासदार डॉ. शिवाजी
काळगे यांनी व्यक्त केले. यावेळी समाज बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लिंगायत समाज कायम काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे माजी महापौर स्मिता खानापुरे
यावेळी बोलतांना माजी महापौर स्मिता खानापुरे म्हणाल्या की, माजी मंत्री सहकार महर्षी
दिलीपराव देशमुख व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी डॉ. शिवाजी काळगे
यांना खासदार केले, तसेच मलाही लिंगायत समाजातील महिलेला महापौर म्हणून काम
करण्याची संधी त्यांनी दिली. महायूतीने राज्यात फोडाफोडीचे राजकारण करून गोंधळ निर्माण
केला, राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. लिंगायत समाज कायम
काँग्रेसच्या पाठीशी उभा आहे असे सांगून येत्या २० नोव्हेंबरला लातूर शहर विधानसभा
मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुखयांच्या नावासमोरील हात चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे
आवाहन त्यांनी केले.
भावनिक न होता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून लातूर जिल्ह्यातील सहा जागा विक्रमी मताधिक्याने निवडून द्याव्यात-संजय शेटे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे म्हणाले की, काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या तत्कालीन आघाडी सरकारने लिंगायत समाजासाठीच्या अनेक मागण्या
पूर्ण केल्या त्यांनी लिंगायत समाजातील ज्यांच्या कासरापाणीत वाणी शब्द असेल त्याला
ओबीसीचे सर्टिफिकेट दिले. महात्मा बसवेश्वर यांचे मंगळवेढ्याचे स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचे
करण्याचा निर्णयही 2014 मध्ये आघाडी सरकारने घेतला त्यामुळे लिंगायत समाजाने भावनिक
न होता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहून लातूर जिल्ह्यातील सहा जागा महाविकास
आघाडीच्या विक्रमी मताधिक्याने निवडून द्याव्यात असे आवाहन त्यांनी केले.
लक्ष्मीकांत मंठाळे, रामलिंग ठेसे, बसवंतआप्पा बरडे यांनी मनोगत व्यक्त करून लातूर
शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित
विलासराव देशमुख यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले या
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवकांत स्वामी व राम स्वामी यांनी केली तर शेवटी आभार नागेश
स्वामी यांनी मानले.