शिवसेना जिल्हाप्रमुखपदी संतोष सोमवंशी यांची निवड
शिवसैनिकांमध्ये उत्साह : जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नामदेव चाळक
लातूर : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांंच्या आदेशानुसार शिवसेनेच्या लातूर जिल्हाप्रमुखपदी राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबरोबरच शिवसेनेच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नामदेव चाळक यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या निवडीमुळे लातूर जिल्ह्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून विधानसभा निवडणुकीत या निवडीमुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांनी याबाबत घोषणा केली. सोमवंशी व चाळक या दोघांच्याही निवडी लातूर शहर, औसा व निलंगा या तीन विधानसभा कार्यक्षेत्रांसाठी झाल्या आहेत. 3 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांनी याबाबतची घोषणा एका अधिकृत पत्राद्वारे जाहीर केली. हे पत्र जिल्हाभरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गेली अनेक वर्ष संतोष सोमवंशी हे लातूर जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही दुष्काळाच्या काळात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद सांभाळत लातूर जिल्ह्यात अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. औसा तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना सोमवंशी यांनी केली. तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हरभरा खरेदी हमीभाव फरक कोट्यवधीची रक्कम मिळवून देण्यासाठी सोमवंशी यांनी केलेले काम जिल्ह्यात नव्हे, तर राज्यात कौतुकास्पद ठरले. विविध संस्थांच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे हे सातत्याने करत आले आहेत. औसा विधानसभा मतदारसंघात गावोगावी फिरून त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना पक्ष मजबूत करण्याचे काम केले आहे. सोमवंशी यांच्या या निवडीमुळे लातूर जिल्ह्यात विशेषतः औसा विधानसभा लातूर शहर विधानसभा व निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे. या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
