सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचा निटूर येथे मेळावा जात पडताळणीचा प्रश्न महायुतीच निकाली काढणार
– आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा विश्वास
निलंगा/ प्रतिनिधी: तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी समाजाच्या जात प्रमाणपत्र व पडताळणी प्रकरणी अन्यायकारक भूमिका घेतली.त्यामुळे हा समाज अडचणीत सापडला असून निलंगा मतदारसंघात आपण हा प्रश्न निकाली काढला आहे. याच धर्तीवर महायुतीचे सरकार संपूर्ण मराठवाड्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न निकाली काढेल,असा विश्वास माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला.निटूर येथील आदिती मंगल कार्यालयात सकल आदिवासी महादेव कोळी समाजाचा मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आ.
निलंगेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलबले तर मंचावर भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर चेअरमन,दगडू साळुंके, निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,माजी सभापती अप्पाराव नाटकरे,रामभाऊ काळगे, माधव पिटले,तम्मा माडीबोने,तानाजी घंटे, तात्याराव गंपले,श्रावण रावळे,अनंत धडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, २००४ मध्ये सत्तेत येणाऱ्यांना सरकार बनवण्यासाठी २५ आमदारांची गरज होती. तेंव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्या आमदारांच्या म्हणण्यानुसार आदिवासी महादेव कोळी समाजास जात प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय घेत मराठवाड्यावर अन्याय केला.तेंव्हापासून मराठवाड्यात जात पडताळणीही होत नाही. निलंगा मतदारसंघासाठी आपण हा विषय सोडविला आहे.संपूर्ण मराठवाडा आणि राज्यातील जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार सक्षम असल्याचे ते म्हणाले.आ.निलंगेकर यांनी सांगितले की,ज्यांनी सत्तेसाठी समाजावर अन्याय केला त्यांचेच पार्सल आपल्या मतदारसंघात पाठवण्यात आले आहे.ते परत पाठवून काँग्रेसला धडा शिकवा.निलंग्यासह इतर मतदारसंघातही प्रत्येक नागरिकाने किमान पाच मते मिळवून द्यावीत. आपले जात प्रमाणपत्र व पडताळणीचा प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत आवाज उठवून मी पाठपुरावा करेन.याप्रकरणी शासनाचा आदेश काढून देण्यासाठी मी बांधील असल्याचे आ. निलंगेकर म्हणाले.
यावेळी बोलताना मराठवाडा अध्यक्ष चंद्रहंस नलमले यांनी समाजावरील अन्याय अन्याय कथन केला.जात प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध आंदोलने केली.केवळ आ.निलंगेकर यांच्यातच हा प्रश्न सोडविण्याची धमक आहे.त्यासाठी समाजाने त्यांच्या मागे पाठबळ उभे करावे,असे ते म्हणाले.राम काळगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव पिटले तर संचलन व आभार प्रदर्शन दत्ता शिंदे यांनी केले. या कार्यक्रमास निलंगा मतदारसंघातील आदिवासी महादेव कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंजारा समाजाच्या विकासाचा अनुशेष भरून काढणार – निलंगेकर
निलंगा येथील केतकी संगमेश्वर मंगल कार्यालयात बंजारा समाजाचा मेळावा संपन्न झाला.बंजारा समाजाचा आजवरचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण कटिबद्ध राहू,अशी ग्वाही आ.निलंगेकर यांनी यावेळी दिली.या मेळाव्यास संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज,अरविंद पाटील निलंगेकर,दगडू साळुंके,कुमोद लोभे, बापूराव राठोड,प्रा.व्ही.डी पवार, सुरेश राठोड,प्रकाश चव्हाण,वसंत राठोड, विक्रम चव्हाण,अरविंद जाधव,वाल्मीक चव्हाण, उत्तम राठोड आदींची उपस्थिती होती.यावेळी नरेंद्र राठोड यांच्या सप्तसूर बंजारा ऑर्केस्ट्राच्या वतीने बंजारा गीतांची मैफील सजवण्यात आली.विविध गाण्यावर समाजातील भगिनींनी ठेका धरला. आ.निलंगेकरही त्यात सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी येथे जात समाजाला स्थैर्य मिळवून देण्यासाठी महामंडळाची घोषणा केली.राज्य सरकारने तांडा वस्ती सुधार योजना आणली. समाजासाठी विविध योजना राबवल्या. त्यामुळे हा समाज भाजपा- महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून या निवडणुकीतही असेच पाठबळ द्यावे,असे आवाहनही आ. निलंगेकर यांनी केले.
