लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीला हद्दपार करतील – भाजपा राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे
आ.संभाजीराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल अभूतपूर्व जनसमुदायाची उपस्थिती
निलंगा /प्रतिनिधी :
महायुती सरकारने अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत.शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी,एक रुपयात पीक विमा, अतिवृष्टी अनुदान या योजनांसोबतच महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सरकारने राबवली.या योजनेत राज्यातील अडीच कोटी महिलांना लाभ मिळाला असून या बहिणींनी महायुतीच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सुपडा साफ होईल,असे प्रतिसादन भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी केले.
भाजपा महायुतीचे उमेदवार माजीमंत्री आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित आशीर्वाद सभेत तावडे बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे,माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर,हुमनाबादचे आ.सिद्धू पाटील, बसवकल्याणचे आ.शरणू सलगर,माजी आमदार गोविंद केंद्रे,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने,युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर,जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिलिंद लातूरे,राहूल केंद्रे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,भारतबाई साळुंके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे,
निलंगा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे,शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेश पाटील,देवणी तालुकाध्यक्ष काशिनाथ गरीबे,विनोद आर्य,सभापती शिवकुमार चिंचनसुरे,नरसिंग बिरादार,सुधीर पाटील, राजवीर पाटील निलंगेकर यांच्यासह मान्यवर या सभेला उपस्थित होते. या विराट सभेस मार्गदर्शन करताना विनोद तावडे म्हणाले,२०१९ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजपा एकत्र लढल्यामुळे मतदारांनी मोठा कौल दिला होता.मात्र सत्तेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत घरोबा केला.गद्दारीची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यापासूनच झाली.
सुरुवात तुम्ही केली.’हम किसीको छेडते नही और हमको छेडा तो छोडते नही ‘ अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा समाचार घेतला.विनोद तावडे म्हणाले की,२०४७ ला देशाच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारताचा साक्षीदार आपण सर्वांना व्हायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणे गरजेचे आहे.अनेक महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात राबविण्यात येत आहेत,असे ते म्हणाले.लोकसभा निवडणुकीत आघाडीला २ कोटी ७० लाख मतदान झाले होते.राज्यात अडीच कोटी महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळाला असून या लाडक्या बहिणींनी आशीर्वादरूपी मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे. फक्त लाडक्या बहिणीने मतदान केले तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा सुपडा साफ होणार आहे.एक रुपयात पीक विमा,शेतकऱ्यांना मोफत वीज,अतिवृष्टी अनुदान अशा अनेक योजना राज्यात राबवल्या आहेत.शासनाने लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर खा.सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या पोटात गोळा उठल्याची टिप्पणीही त्यांनी केली. यावेळी बोलताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, रस्ते,इमारती असा विकास होतच असतो पण मतदारसंघातील प्रत्येक उंबरठ्याचे उत्पन्न वाढविण्याचे काम आपण केले आहे.या कामात खोडा घालण्याचे काम जिल्ह्यातील काही नेत्यांनी केले.महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझ्यावरील राग मतदारसंघातील जनतेवर काढला.कोविडच्या संकटात ऑक्सिजन सिलेंडर मिळू दिले नाहीत.जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात मी सोबत आहे.त्यांच्याच आशीर्वादाने महायुती सरकार आल्यानंतर मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढत विकासाची गंगा वाहती केली.ज्या मंडळींनी मला त्रास दिला त्यांनी मागच्या १० वर्षात आपल्या मतदारसंघात किती निधी आणला ? ते सांगावे.निलंगासाठी मी आणलेल्या निधीच्या १० टक्के निधी जरी त्यांनी आणला असेल तर मी निवडणुकीतून माघार घेईन.ही लढाई निलंग्याच्या स्वाभिमानाची आहे. निलंगा विरुद्ध काँग्रेसची बी टीम अर्थात बाभळगाव यांच्यात ही लढाई होत आहे. निलंग्याचे मतदार माझ्यासोबत आहेत. आपले आशीर्वाद व पाठबळावरच आजवरची वाटचाल सुरू असल्याचे आ.निलंगेकर म्हणाले.
निलंगा मतदार संघातून जाणाऱ्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.पुढील कामासाठी आपण पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षा आ. निलंगेकर यांनी व्यक्त केली. सामाजिक,जातीय व सांस्कृतिक एकोपा कायम राखण्यासाठी काँग्रेसला हद्दपार करा,असे आवाहनही त्यांनी केले.
जनसमुदायाला मार्गदर्शन करताना माजी खासदार रूपाताई पाटील म्हणाल्या की,निलंग्याची जनता स्वाभिमानी आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनी निलंग्याला डिवचण्याचे काम करत अपप्रचार चालवला आहे. जनतेत संभ्रम पसरवला जात आहे.यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.निलंग्याचे मतदार अशा लोकांना जागा दाखवतील असे सांगून या निवडणुकीत आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांना आशीर्वाद द्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.
युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की,संयम व समर्थन हे दोन गुण आम्ही विनोद तावडे यांच्याकडूनच शिकलो.मागील काळात आम्ही बॅकफुटवर काम केले.तरीही शासनाची प्रत्येक योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत राहिलो.आता आपण आम्हाला फ्रंटफुट वर खेळण्याची संधी द्यावी. त्यासाठी आपण आम्हाला ताकद द्या.नम्रतेने वागत आम्ही जनतेची सेवा करू.कार्यकर्त्यांनी जिल्हा व मतदारसंघाच्या विकासासाठी पुढील २० दिवस द्यावेत.तुमचा भाऊ,मित्र,मुलगा म्हणून मी सर्वांसोबत राहून विकासासाठी प्रयत्नशील राहीन,असेही ते म्हणाले.
यावेळी आ.सिद्धू पाटील,आ.शरणू सलगर, संजय दोरवे,भगवानराव पाटील तळेगावकर यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले.या आशीर्वाद सभेस निलंगा मतदारसंघातील निलंगा,देवणी व शिरूर अनंतपाळ तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

रेल्वेसह मंत्रीपदही देणार – विनोद तावडे
सभेत बोलताना विनोद तावडे म्हणाले की, विकासासाठी कायम तत्पर असणारे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे आमचे मित्र आहेत.ते कधीही काहीही मागत नाहीत.प्रथमच त्यांनी रेल्वे संदर्भात मागणी केली आहे. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.आपण संभाजीरावांना एक लाखाहून अधिक मताधिक्य दिले तर त्यांना मंत्रिपद देऊ,असा शब्दही विनोद तावडे यांनी दिला.
विराट सभेने विजयावर शिक्कामोर्तब ….
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आयोजित सभेला हजारोंच्या संख्येने मतदार व नागरिक उपस्थित होते. सर्वत्र ढोल-ताशांचा गजर सुरू होता.हातात झेंडे घेतलेले हजारो नागरिक,प्रचंड घोषणाबाजी यामुळे संपूर्ण निलंगा शहर भाजपमय झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.उपस्थितांच्या गर्दीने निलंगा शहर जवळपास पाच तास जाम झाले होते.यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशीच आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा ऐकण्यात येत होती.