आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंग्यात जनसन्मान पदयात्रा
निलंगा/प्रतिनिधी:माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी (दि.२२)निलंगा शहरातून जनसन्मान पदयात्रा काढली. ठिकठिकाणी या यात्रेचे उस्फूर्त स्वागत झाले.आ.निलंगेकर यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघात जनसन्मान पदयात्रा काढून मागील काळात केलेल्या विकास कामांची माहिती जनतेला दिली.शहरात मंगळवारी हा उपक्रम राबविण्यात आला.आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळे,भाजपाचे शहराध्यक्ष ॲड.वीरभद्र स्वामी,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,रिपाई आठवले गटाचे अंकुश ढेरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन चाऊस यांचा प्रमुख सहभाग होता.
आ.निलंगेकर यांच्या निलंगा शहरातील निवासस्थानापासून या पदयात्रेस प्रारंभ झाला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला आ.निलंगेकर यांनी अभिवादन केले. त्यानंतर शिवाजीनगर मधील जगदंबा देवीचे दर्शन त्यांनी घेतले.तेथून पुढे हाडगा रोड,अडत लाईन,शिक्षक कॉलनी, लोंढे नगर,जिजाऊ चौक, गांधीनगर,अशोक नगर, मिलींद नगर,पेठ,माळी गल्ली,मारवाडी गल्ली, नीळकंठेश्वर मंदिर,दापका वेस,कोळे गल्ली,मातंग गल्ली,आनंदमुनी चौक, औरंगापुरा,ढोर गल्ली, दत्तनगर या मार्गे निवासस्थानी या पदयात्रेचा समारोप झाला.
पदयात्रेदरम्यान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मयोगी माजी मुख्यमंत्री स्व.डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुतळ्यास आ.निलंगेकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. शहरातील सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे व मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले.शहराच्या विविध भागात पद यात्रेनिमित्त आलेल्या आ.निलंगेकर यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.महिलांनी ठिकठिकाणी त्यांना औक्षण केले.विविध ठिकाणी पदयात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. पदयात्रेदरम्यान आ. निलंगेकर यांनी शहरासह मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती नागरिकांना दिली.मतदार संघासाठी भविष्यातील योजनांबाबत त्यांनी नागरिकांना अवगत केले.या पदयात्रेत महायुतीचे पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विरोधकांना सडेतोड उत्तर मिळेल- आ.निलंगेकर

पदयात्रेच्या समारोपप्रसंगी बोलताना आ.संभाजीराव पाटील म्हणाले की,ही निवडणूक माझ्यासाठी नाही तर मतदारसंघाच्या स्वाभिमानासाठी लढवली जात आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळात निलंगा मतदारसंघावर अन्याय करण्यात आला. मतदारसंघातील विकास कामांसमोर अडचणी उभ्या करण्यात आल्या. मतदारसंघातील नागरिकांचा स्वाभिमान दुखावण्याचे काम त्या काळात राज्य सरकार व आघाडीच्या नेत्यांनी केले. नंतरच्या महायुती सरकारने मतदारसंघाचा व जनतेचा सन्मान वाढवण्यासाठी काम केले आहे.आता मतदारसंघातील जनतेच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली आहे. विरोधक मला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहेत पण मतदारसंघातील जनता स्वाभिमानी असून तीच विरोधकांना सडेतोड उत्तर देईल,असे ते म्हणाले. मराठवाड्यात व राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,मतदार व नागरिकांनी पुढील ३० दिवस झपाटून कामाला लागावे,असे आवाहनही त्यांनी केले.