• Tue. Apr 29th, 2025

‘काँग्रेसची 96 जागांवरची चर्चा पूर्ण…

Byjantaadmin

Oct 21, 2024

महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपारुन मतभेद असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. पण या दोन्ही नेत्यांकडून आमच्यात कोणताही वाद झाला नाही, असा दावा केला जातोय. दोन्ही बाजूने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत बोलावून घेतलं आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटप आणि उमेदवार ठरवण्याबाबत चर्चा सुरु आहे. या बैठकांमध्ये आतापर्यंत काय-काय चर्चा झाली, याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेसची 96 जागांवर चर्चा पूर्ण झाल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.

“महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. जागा वाटपाची चर्चा सुरु असून ही चर्चा लवकरच पूर्ण होईल. आतापर्यंत काँग्रेसच्या ९६ जागांवरील चर्चा पूर्ण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. या चर्चेनंतर उद्याच उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले यांनी दिल्लीत माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

ठाकरे गटासोबतच्या वादावर नाना पटोले काय म्हणाले?

“शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. भारतीय जनता पक्ष जाणीवपूर्वक विरोधी पक्षांबद्दल गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करत आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव होईल. पराभवाच्या भितीने भाजपा अशी खेळी करत आहे. काँग्रेस कडूनही अशा पद्धतीचे कोणतेही विधान केलेले नाही. महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आणण्यासाठी आमच्या सर्वांचे एकत्रित प्रयत्न सुरु आहेत”, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांची भाजपवर टीका

“भाजपचे हिंदू प्रेम नकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि स्वयंभू विश्वगुरु, असा प्रचार करण्यात आला. या 11 वर्षात शेतकऱ्यांचा आत्महत्यांमध्ये वाढ झाली त्यात जास्त हिंदूच होते. बेरोजगाराला कंटाळून तरुणांच्या आत्महत्या झाल्या त्यातही जास्त हिंदूच आहेत. भाजपाची सत्ता आली की हिंदूवर अन्याय केला जातो हे लपून राहिले नाही. भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केले असे जाहीरपणे सांगायचे आणि उमेदवारांच्या यादीत औरंगाबाद लिहायचे ही दुतोंडी भूमिका आहे. काँग्रेस पक्षाची सर्वधर्म समभावाची स्पष्ट भूमिका आहे”, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed