मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरांना वेग आला आहे. महायुतीमधील दोन नेत्यांनी ठाकरेसेनेत प्रवेश केला आहे. माजी आमदार राजन तेली, दीपक साळुंखे, सुरेश बनकर यांनी मशाल हाती घेतली आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते शिंदेसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघांमधील आहेत. त्यामुळे आता शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंनीदेखील मॅन टू मॅन मार्किंग केल्याची चर्चा सुरु झाली आहे.
एकनाथ शिंदेंनी २०२२ मध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं बंड केलं. या बंडात त्यांना तब्बल चाळीस आमदारांनी साथ दिली. त्यांचा उल्लेख ठाकरेंकडून सातत्यानं गद्दार असा केला जातो. शिंदेंना बंडात साथ देणाऱ्या या आमदारांना विधानसभेत धूळ चारण्यासाठी ठाकरेंनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून मातोश्रीवर तीन नेत्यांचा पक्षप्रवेश झाला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी मशाल हाती घेतली. ते राष्ट्रवादीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा पक्षप्रवेश अजित पवारांसाठी धक्का मानला जात आहे. सांगोल्यात शिंदेसेनेचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत. त्यांच्याविरोधात साळुंखेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण सांगोल्याच्या जागेसाठी शेतकरी कामगार पक्ष आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगोल्याची जागा कोणाला सुटणार हा प्रश्न महत्त्वाचा आहे.भाजपचे नेते आणि माजी आमदार राजन तेली यांनीही ठाकरेसेनेत प्रवेश केला आहे. तब्बल १९ वर्षांनी त्यांनी घरवापसी केली आहे. नारायण राणेंसोबत गेलो, शिवसेना सोडली ही माझ्या हातून घडलेली मोठी चूक होती, अशी भावना त्यांनी पक्षप्रवेशानंतर बोलून दाखवली. त्यांना सावंतवाडीतून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दीपक केसरकर इथले आमदार आहेत. ते शिंदेसेनेत आहेत. त्यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रिपद आहे. तेली यांचा ठाकरेसेनेतील प्रवेश राणेंसाठी धक्का मानला जात आहे.भाजप नेते सुरेश बनकर यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेसेनेत प्रवेश केला. ते छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून २०० गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीवर पोहोचले. जवळपास ३५ वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. विशेष म्हणजे बनकर यांच्यासोबत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, १०३ बूथ प्रमुख, ११५ शक्ती प्रमुख, शेकडो पन्ना प्रमुख यांनी ठाकरेसेनेत प्रवेश केला. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार शिंदेसेनेत आहेत. त्यांच्याकडे अल्पसंख्यात विकास मंत्रिपद आहे. त्यांच्याविरोधात बनकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
