कोयत्याने वार करून रस्त्यावर खून दोघा भावांसह आईला धाराशिवमधून अटक
लातूर : काल सकाळी लातूरच्या दयानंद महाविद्यालयाच्या गेट समोरील जुनी रेल्वे लाईन रस्त्यावर कोयत्याने वार करून एका तरूणाची हत्या करण्यात आलीहोती. घटना घडताच पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषण व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने या प्रकरणातील सख्खे दोन भाऊ व त्यांची आई असे तिघांना धाराशिव येथील वडार गल्लीतून अटक केली. घरगुती कारणावरूनकाल १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास रेल्वेलाईन वरील रस्त्यावर कोयता (कत्तीने) गळ्यावर वार करून शिवाजी त्र्यंबक देवकर याचा खून केला होता. हा प्रकार घडताच परिसरात मोठी गर्दी झाली. मयताच्या कुटुंबियांनी घटनास्थळी येऊन हंबरडा फोडला होता. बातमी ऐकून प्रत्येक जण कायदा सुव्यवस्थेविषयी शंका निर्माण करित असतानाच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त
पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे अन्वेषण विभाग व शिवाजीनगर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने मोठ्या शिताफीने कारवाई करून या खून प्रकरणातील संशयीत अजय सुनिल मुद्दे, कृष्णा सुनिल मुद्दे व त्यांची आई सर्व रा. बाबा नगर, दगडी कमान खाडगाव रोड लातूर यांना धाराशिव येथील वडार गल्ली, शिवाजी चौक येथून अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली
इरटिका कार जप्त करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार युवराज गिरी, राहुल सोनकांबळे, अर्जुन राजपूत, पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलिस अमलदार काकासाहेब बोचरे, महिला पोलीस अंमलदार साधना सूर्यवंशी यांनी केली आहे.
