• Mon. Apr 28th, 2025

रेल्वेची निर्मिती करणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख निर्माण केली-अरविंद पाटील निलंगेकर

Byjantaadmin

Oct 11, 2024

रेल्वेची निर्मिती करणारा जिल्हा म्हणून लातूरची ओळख निर्माण केली

जनसन्मान संवाद यात्रेदरम्यान अरविंद पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन

निलंगा दि. १० (प्रतिनिधी) : तिव्र पाणीटंचाईचा जिल्हा म्हणून लातूरची ओळख होती. लातूर शहराला तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यामुळे दुष्काळी लातूर असा कलंक लागला होता. हा कलंक पुसण्यासाठी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या पालकमंत्रीपदाच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार व इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवून लातूर शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढवलेली होती. त्यामुळेच या जिल्ह्यात रेल्वे कोच निर्मितीचा कारखाना उभारण्यात यश आलेले असल्याचे सांगून ज्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी आणावे लागले त्या लातूरची रेल्वे डब्याची निर्मिती करणारा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यात यश आले असल्याचे माहिती भाजपचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी दिली.

निलंगा विधानसभा मतदारसंघांतर्गत गत काही दिवसांपासून जनसन्मान संवाद यात्रा सुरू आहे. ही यात्रा निलंगा तालुक्यातील वडगाव, आनंदवाडी (शि. को.), अंबुलगा मेन, येथे पोहचल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते. या वेळी तालुकाध्यक्ष कुमुद लोभे, संंगांयो कमिटीचे अध्यक्ष शेषेराव ममाळे, माजी जि. प. सदस्य धोंडीराम बिरादार, अरविंद पाटील जाजनुरकर, दत्ता मोहोळकर, दिनकर गोमसाळे आदींसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती.

मराठवाड्यासह लातूरला दुष्काळी भाग म्हणून ओळखले जात होते. त्यामुळेच जिल्ह्यात मोठे उद्योग उभारत नव्हते. परिणामी रोजगारही निर्माण होत नव्हते. असे सांगून अरविंद पाटील निलंगेकर यांनी लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यामुळे हा कलंक पुसणे अत्यंत गरजेचे होते. सदर बाब लक्षात घेवूनच आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात लातूर शहरासह जिल्हाभरात जलयुक्त शिवार आणि इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवून शहरासह जिल्ह्यातील पाणीपातळी वाढविण्याचे मोठे काम केले. विशेष म्हणजे या कामाचेकौतूक होवून केंद्र सरकारच्या वतीने पुरस्कार देवून जिल्ह्याचा गौरवही करण्यात आलेअसल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील पाणी पातळी वाढली आणि दुष्काळी लातूर हा कलंकही पुसण्यास यश आले. परिणामी लातूर येथे आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यातून मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारण्यात आली, असल्याचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

या कोच फॅक्टरीच्या माध्यमातून केवळ लातूर जिल्ह्यालाच नव्हेतर मराठवाड्याला मोठा फायदा होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवू लागली आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पातून जगभरात मागणी असलेल्या वंदेभारत रेल्वेचे डब्बे निर्माण होणार असून या डब्ब्यांवर मेड इन लातूरचा शिक्का असणार आहे. त्यामुळेच ज्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली त्या जिल्ह्याची ओळख रेल्वे डब्ब्याची निर्मीती करणारा जिल्हा म्हणून होणार असल्याचे सांगितले. निलंगा मतदार संघासह जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणारी अशी अनेक कामे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या माध्यमातून झाली असल्याचे सांगत मतदारसंघासह जिल्ह्याचा स्वाभिमान आणि सन्मान उंचावण्यासाठी आगामी काळातही महायुतीसह आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठिशी ताकद उभी करावी, असे आवाहन अरविंद पाटील निलंगेकर यांनी केलेआहे.

या यात्रेदरम्यान विविध शासकीय योजनांच्या लाभार्थी नागरिकांचा, जेष्ठ नागरिकांचा व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी भगिनींची सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला. यावेळी माधव सूर्यवंशी, पंडीत महाराज, हणमंत जाधव, माधवराव पाटील, रामराव पाटील, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानदेव झरे, संभाजी माने, दयानंद घुगे, वसंत पाटील, अण्णाराव माने, बालाजी माने, भागवत माने आदींसह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलंगा व देवणी नुतन बसस्थानकाचे आज लोकार्पण

निलंगा मतदारसंघांतर्गत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंंगेकर यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत अनेकविकासकामे झालेली आहेत. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी त्यात कोठेही खंड पडू नये व विकास कामे दर्जेदार व्हावीत यासाठी आ. निलंगेकर सातत्याने प्रयत्नशील असतात. या माध्यमातूनच निलंगा मतदारसंघांतर्गत असलेल्या निलंगा व देवणी या  ठिकाणी भव्य व सुसज्ज बसस्थान असावे अशी संकल्पना त्यांनी मांडली होती. या संकल्पनेला आता मुर्तरूप आलेले असून या दोन्ही ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी नुतन बसस्थानकाचे उभारणी करण्यात आली आहे. त्याच बसस्थानकांचे आज लोकापर्ण आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed