मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. पूर्वाश्रमीच्या शिवसेनेच्या आक्रमक असलेल्या महिला नेत्या वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी देत रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण मतदारसंघात चुरशीचा सामना रंगणार असून, श्रीकांत शिंदेंना निवडणूक जड जाण्याच्या दृष्टीने ठाकरे गटाने या ठिकाणी रणनीती आखली आहे
.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विराधोत महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची उत्कंठा संपली असून, शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी 1 लाखाच्या आसपास त्यांना मते पडली होती. या निवडणुकीत त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या. आता त्या शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून, खासदार शिंदे यांच्यापुढे कोणते आव्हान उभे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असून, या जिल्ह्यातील ठाणे व कल्याण लोकसभा मतदारसंघ आपल्या हातातून जाऊ नये, यासाठी त्यांची लढाई सध्या सुरू आहे. महायुतीमधील मित्रपक्ष भाजपकडून त्यांची कोंडी होत असून, सुपुत्र श्रीकांत यांचा मतदारसंघ हा भाजपकडे जाऊ नये तसेच आनंद दिघे यांनी खेचून आणलेला ठाणे मतदारसंघदेखील आपल्या हातून जाऊ नये, यासाठी शिंदे गट प्रयत्नशील आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदे गट असे वातावरण असल्याने त्याचा फायदा करून घेण्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ठरविले आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे या नेत्यांनी कल्याण पूर्वेत सभा घेत हा मतदारसंघ गाजवला. ठाकरे गट येथे आपली ताकद लावून शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करणार याची चर्चा आधीपासून येथे सुरू होती.
ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर, कॉंग्रेसचे संतोष केणे, केदार दिघे यांचे नाव आघाडीवर असतानाच ठाकरे यांनी माजी नगरसेविका वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करून सर्वांना अवाक् केले आहे. मूळच्या शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर यांनी मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर राज ठाकरे यांची साथ धरली होती. 2009 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकदेखील मनसे पक्षाकडून लढली. या वेळी त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे वसंत डावखरे व शिवसेनेचे आनंद परांजपे यांचे आव्हान होते.
त्यांनी त्यावेळी 1 लाख मते घेत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर मार्च 2016 ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न जाता ठाकरे गटातच राहणे पसंत केले. उद्धव ठाकरे यांची भेट झाली. त्यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणूक तुम्ही लढविली होती.याविषयी विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचा अनुभव आणि मताधिक्यांची माहिती दिली. परंतु, आपल्याला उमेदवारी दिली जाईल याची खात्री दरेकर यांना नव्हती. पक्षप्रमुख ठाकरे यांनी दरेकर यांना उमेदवारी देत खुद्द दरेकर यांनादेखील आश्चर्यचकित केले आहे. दरेकर यांच्या उमेदवारीमुळे आता ठाकरे गटाकडून उमेदवार कोण याची उत्सुकता संपली आहे.