बीड:-भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलेला मानहानीचा दावा शिरुर न्यायालयाने दाखल करुन घेतला आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.चित्रा वाघ यांनी 2021 मध्ये मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. त्यावरून मेहबूब शेख यांनी शिरूर पोलिसांमध्ये चित्रा वाघ यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शेख यांच्याकडून दावा दाखल करण्यात आला होता. त्याच्यानंतर शिरूरच्या न्यायालयामध्ये कलम 499 आणि 500 अंतर्गत फौजदारी बदनामीचा दावा केला. तो न्यायालयाने दाखल करुन घेतला आहे.
दोन वर्षांपुर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर दाखल झालेला बलात्काराच्या गुन्हा खोटा आहे. मालेगावचा नगरसेवक नदिमोद्दीन शेख उर्फ नदिम पिटर याने माझ्यावर अत्याचार करुन महेबुब शेख यांच्या विरोधात खोटी तक्रार द्यायला लावली. त्यात आष्ठीमध्ये भाजप आमदार सुरेश धस व नेत्या चित्रा वाघ यांचा त्या कटात सहभाग झाला, असे खळबळजनक आरोप 30 वर्षीय पिडितेने केला आहे. तीच्या तक्रारीवरुन जिन्सी पोलिस ठाण्यात नदिमोद्दीन व त्या या सगळ्या कटात मदत करणाऱ्या मूुकूंदवाडीतील विशाल खिल्लारे विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
डिसेंबर, 2020 मध्ये महेबूब शेख यांच्यावर सिडको पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. त्यातील पिडितेची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, एकूण तपासात वारंवार अनेक त्रुटी समोर आल्या. न्यायालयाने याप्रकरणी तपास पथकावर देखील अयोग्य तपासाचा ठपका ठेवला.
मेहबूब शेख यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात तयारी करवून तक्रार देण्यास लावल्याचा आरोप पिडीतेने केला होता. त्यानंतर आष्ठीमध्ये नेऊन धस व वाघ यांनी माध्यमांसमोर बोलण्याचे ट्रेनिंग दिले. वाघ यांनी मला तुला आता एफआयरमध्ये जे लिहिले, तेच कायम सांगायचे आहे, अन्यथा जेलमध्ये सडशील, असे धमकावले, धस यांनी माध्यमांना देण्याची प्रतिक्रिया लिहून दिली. जाताना मी तुला यापुढे कधीही ओळखणार नाही, असे वाघ यांनी सांगितले, असे देखील पिडीतेने तक्रारीत म्हटले.