• Tue. Apr 29th, 2025

असंघटीत कामगारांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद; मतदानाचा हक्क बजावण्याचे केले आवाहन

Byjantaadmin

Apr 2, 2024

असंघटीत कामगारांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद; मतदानाचा हक्क बजावण्याचे केले आवाहन

लातूर, दि. 02 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी राबविण्यात येत असलेल्या स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असंघटीत कामगारांशी संवाद साधला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी अनमोल सागर, स्वीप समितीचे नोडल अधिकारी नगरपालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, शिक्षणाधिकारी नागेश मापारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, स्वीप कक्षाचे रामेश्वर गिल्डा यावेळी उपस्थित होते.

मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा-ठाकूर घुगे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात लोककला पथक, प्रभातफेरी, पालक मेळावे यासारख्या विविध माध्यमांतून मतदार जनजागृती करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज जागतिक ऑटीझम दिनानिमित्त आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी दरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असंघटीत कामगारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली.

जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी असंघटीत कामगारांशी संवाद साधून त्यांना मतदानाचे महत्व सांगितले. तसेच लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक मत अमूल्य असून सर्वांनी 7 मे 2024 रोजी मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पथनाट्याद्वारे मतदानाविषयी माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed